मुंबई : ‘दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो ९’ या १३.६ किमी लांबीच्या या मार्गिकेतील दहिसर-काशीगाव ४.५ किमी लांबीच्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या चाचणीला (ट्रायल रन) बुधवारपासून सुरुवात होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात होईल. चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरअखेर दहिसर-काशीगाव टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रेदश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे.

विद्युत प्रवाह कार्यान्वित

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर-गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेला जोडणारी ही मार्गिका आहे. १० मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दहिसर- काशीगाव असा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल. मार्गिकेवरील रुळ, सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून विद्याुत प्रवाह कार्यान्वित करण्यात आला आहे.

डिसेंबरमध्ये टप्पा १ च्या संचलनाचे नियोजन

सुमारे ४.५ किमी लांबीच्या या मार्गिकेवर बुधवारी चाचण्यांना सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवारी पहिल्यांदाच दहिसर – काशीगावदरम्यान मेट्रो धावणार आहे. या चाचण्या पुढील काही महिने सुरूच राहतील. दहिसर – काशीगावदरम्यानच्या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आणि चाचण्या यशस्वी झाल्यानंतर एमएमआरडीएकडून रिसर्च डिझाईन अँड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाईल. त्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सीएमआरएसचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास दहिसर – काशीगाव मेट्रो मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.