मुंबई : गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदान परिसरात चिखल झाला असून शिवसेनेचा (शिंदे) यंदाचा दसरा मेळावा आता आझाद मैदानात होणार नाही हे निश्चित झाले आहे. मात्र या मेळाव्यासाठी आझाद मैदानावरील रामलीलाचा कार्यक्रम अन्य मैदानावर स्थलांतरित करण्यात आला आहे. आझाद मैदानावर आता मेळावाही नाही आणि रामलीलाही नाही. त्यामुळे रामलीला आयोजकांमध्ये नाराजी आहे. मेळावा इथे घ्यायचा नव्हता, तर दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान अडवून का ठेवले, असा सवाल रामलीला आयोजकांनी केला आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात मुंबईत विविध ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आझाद मैदानावरही गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ रामलीलाचे आयोजन केले जात होते. मात्र २०२३ मध्ये शिवसेनेने (शिंदे) दसरा मेळाव्यासाठी रामलीला आयोजकांवर दबाव आणून रामलीला लवकर गुंडाळायला लावली. तेव्हापासून रामलीला आयोजकांना आझाद मैदानात परवानगी न देता चर्चगेटच्या कर्नाटक फूटबॉल ग्राऊंडवर रामलीला सादर करण्यासाठी परवानगी दिली जात आहे.

गेली दोन वर्षे रामलीला याच मैदानावर सादर केली जात आहे. यंदाही शिवसेनेचा (शिंदे) दसरा मेळावा आझाद मैदानात होणार होता. त्यामुळे रामलीलासाठी कर्नाटक ग्राऊंड देण्यात आले. मात्र रविवारी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक मैदानात गुडघाभर पाणी साचले. रामलीला कार्यक्रमाचे व्यासपीठाजवळ गुडघाभर पाणी साचल्यामुळे प्रेक्षकांच्या खुर्च्याही पाण्यात गेल्या. त्यामुळे रामलीलाचे सादरीकरण रविवारी होऊ शकले नाही. आझाद मैदानातही पावसामुळे चिखल झाला असून शिवसेनेनेही (शिंदे) आपल्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी मैदानात खुर्च्या आणि व्यासपीठ उभारण्यासाठी साहित्यही आणले होते. मात्र चिखल बघून आयत्या वेळी ठिकाण बदलण्यात आले.

आझाद मैदानात पावसामुळे चिखल झाल्याने शिवसेनेने (शिंदे) आपला दसरा मेळावा आता गोरेगावच्या नेस्को मैदानावर घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आझाद मैदानात यंदा रामलीलाही होणार नाही आणि मेळावाही होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र मेळाव्यासाठी मैदान राखीव ठेवण्याकरीता रामलीला आयोजकांना परवानगी दिली नव्हती. हे आधीच ठरवून रामलीला कार्यक्रमासाठी आझाद मैदान दिले असते तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला यांनी दिली.

आझाद मैदानावर मेळावा आणि रामलीला नाही.

याबाबत शुक्ला यांनी सांगितले की, गेली ४० वर्षांहून अधिक काळ आझाद मैदानावर रामलीलाचे आयोजन केले जात होते. त्यात कधीही खंड पडला नाही. परंतु, २०२३ मध्ये शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेनेने (शिंदे) आपला दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याचे ठरवले होते. शिवसेनेने (शिंदे) आधी शिवाजी पार्क मैदानातच मेळावा घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात शिवसेनेला (ठाकरे) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेने (शिंदे) आयत्या वेळी आझाद मैदानावर मेळावा घेण्याचे ठरवले होते. त्याकरीता रामलीला आयोजकांवर दबाव टाकून रामलीला नवव्या दिवशीच संपवण्यास भाग पाडले होते आणि दसऱ्याला मेळाव्यासाठी मैदान मोकळे करून घेतले. तर २०२४ मध्ये रामलीलासाठी आझाद मैदानावर परवानगी न देता दुसऱ्या मैदानावर परवानगी देण्यात आली. यंदाही रामलीला कार्यक्रम आझाद मैदानाऐवजी चर्चगेटच्या कर्नाटक मैदानावर करण्यास परवानगी दिली. मेळाव्यासाठी आझाद मैदान अडवून ठेवले आणि आयत्या वेळी मेळावा दुसऱ्या ठिकाणी घेतला, याबद्दल रामलीला आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.