मुंबई पोलिसात एकेकाळी कार्यरत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर ‘अब तक ११२’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रसंगांचा उलगडा केला. दरम्यान राज ठाकरेंना ठार करण्याचा कट होता अशीही माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले प्रदीप शर्मा?

“सादिक कालियाचा १२ डिसेंबर १९९७ ला एन्काऊंटर केला होता. सादिक कालिया दाऊद गँगचा प्रमुख शूटर होता. २२ हत्यांमध्ये तो स्वतः होता. तो वाँटेड होता. तो गँगमध्ये कसा होता आम्ही माहिती काढली. आधी सादिक कालिया अरुण गवळीच्या गँगमध्ये होता. त्यात हत्येच्या सुपारीसाठी सादिकचा नंबर लागायचा नाही. त्याच्या बहिणीचा नवरा इप्तिकार म्हणून होता तो पण याच गँगमध्ये होता. इस्माइल मलबारी म्हणून दाऊदचा एक गँगस्टर होता. त्याला जाऊन हे दोघं भेटले आणि छोटा शकीलचा नंबर घेतला. छोटा शकीलला सादिकने सांगितलं की मला तुझ्या गँगमध्ये यायचं. त्यावर छोटा शकील म्हणाला तुला गवळीने पाठवलं नाही कशावरुन? सादिक कालिया म्हणाला तुम्ही सांगाल ते काम करतो. त्यावर छोटा शकील म्हणाला जा तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला ठार कर. सादिक म्हणाला हत्यार पाठवा. तर छोटा शकिल म्हणाला हत्यार नाही तुला त्याला चॉपरने मारायचं आहे. त्यावर सादिकने त्याच्या मेहुण्याला म्हणजेच बहिणीच्या नवऱ्याला चॉपरने ठार केलं. त्यानंतर तो छोटा शकील बरोबर दाऊदसाठी काम करु लागला.” अशी एक आठवण प्रदीप शर्मा यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. अशा प्रकारच्या घटना या चित्रपटात आहेत असंही प्रदीप शर्मा म्हणाले.

मातोश्रीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तीन अतिरेक्यांचा खात्मा कसा केला?

२००३ मध्ये मुलुंडला ट्रेन मध्ये स्फोट झाले होते. त्यातले जे वाँटेड होते ते पाकिस्तानी आणि काश्मिरी होते. बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर ते हल्ला करणार होते. आमच्याकडे गाडी नंबर होता. तेव्हा सत्यपाल सिंग सह पोलीस आयुक्त होते, तर आर. एस. शर्मा सरही होते त्यांनी मला सांगितलं सांभाळून जा. बुलेटप्रुफ जॅकेट घालून गेलो. त्या जॅकेटला तेव्हा दोन गोळ्या लागल्या. दुपारी १२ वाजता आम्ही त्यांचं एन्काऊंटर केलं. या तिघांना मातोश्रीवर हल्ला करायचा होता. त्यावेळी मी एक सेकंद जरी इकडे तिकडे झालो असतो तर माझा जीव गेला असता. असंही प्रदीप शर्मा यांनी सांगितलं.

राज ठाकरेंचा जीव कसा वाचला?

“आम्ही १० ते १२ नंबर ट्रॅक करत होतो. त्यात अचानक राज ठाकरेंचा उल्लेख झाला. राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता. राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते. त्यांच्या जिवाला धोका आहे हे आम्हाला समजलं. आम्ही सगळी माहिती तेव्हा सह पोलीस आयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरेंना आयुक्त जाऊन भेटले आणि सांगितलं की तुमच्या जिवाला धोका आहे तुम्ही कोकण दौरा करु नका. त्यावेळी त्यांनी तो दौरा रद्द केला होता. ” अशी माहिती प्रदीप शर्मांनी दिली.