मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याची घोषणा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्यच तयार नसल्याचे उघडकीस आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणाची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचा मराठीमधून अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन्य राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण त्यांच्या भाषेतून मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही मराठीतून वैद्यकीय शिक्षण मिळायला हवे, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठीमधून वैद्यकीय शिक्षण शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने समितीही स्थापन केली. त्यानुसार मराठीमधून अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपविण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचे इंग्रजी भाषेतील शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये भाषांतरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपवण्यात आली. विद्यापीठाने ही जबाबदारी स्वीकारून भाषांतर करण्यासाठी नियुक्त करण्यात येणारे प्राध्यापक, मुद्रित शोधक आदींच्या मानधनासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. संचालनालयाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र सरकारने या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे मराठी भाषांतर करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.

हेही वाचा – मुंबई : पावसात ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुरळीत, दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाख १४ हजारांपार

नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यनंतर राज्यामध्ये २० जुलैपासून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मराठीमधून वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साहित्यच उपलब्ध नाही.

हेही वाचा – मुंबईत संततधार; लोकल सेवेची नेमकी स्थिती काय? रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट…

वैद्यकीय शिक्षणासाठी मराठीमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. – डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year medical education is far from marathi the work of curriculum translation is slow mumbai print news ssb