मुंबई : वांद्रे आणि जोगेश्वरी परिसरात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जोगेश्वरी येथील अपघातात दुचाकीला रिक्षाने धडक दिली, तर वांद्रे येथील अपघातात टॅक्सीने दुचाकीला धडक दिली. धडक देणारा रिक्षाचालक फरारी असून टॅक्सीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहिला अपघात जोगेश्वरी (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर झाला. राकेश जगताप (२२) रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास आपल्या मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाकडे जात होता. त्यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर त्याला भरधाव वेगा आलेल्या रिक्षाने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार की त्यामुळे राकेश दुचाकीवरून फेकला गेला.
या अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून फरारी झाला. राकेशवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. फरारी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रण (फुटेज) तपासण्यास सुरुवात केली असून संबंधित रिक्षाची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकाकडून (आरटीओ) मागवण्यात आली आहे. राकेश हा संगणकशास्त्र विभागाचा विद्यार्थी असून गोरेगाव येथे वास्तव्यास आहे.
दुचाकीला टॅक्सीची धडक
दोन तरूण जखमी दुसरा अपघात वांद्रे (पश्चिम) येथील हिल रोडवर झाला. यामीन हुसेन (१९) आणि त्याचा मित्र ईशान राणा (२०) दुचाकीवरून जात होते. एका टॅक्सीने अचानक वळण घेतले आणि दुचाकी टॅक्सीवर आदळली. या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. टॅक्सीचालक राजेश शाहला (२४) नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. वांद्रे पोलिसांनी त्याच्याविरोधात बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ‘आम्ही तवा हॉटेलहून चिम्बाई रोडकडे परत येत असताना टॅक्सीने अचानक वळण (यू-टर्न) घेतले. त्यामुळे आमची दुचाकी टॅक्सीच्या डाव्या भागावर आदळली आणि आम्ही दोघेही रस्त्यावर फेकले गेलो, असे या अपघातात जखमी झालेल्या यामीन हुसेन याने सांगितले.