मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) अभियांत्रिकी – विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलाॅकिंगची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, आता या कामामधील त्रुटी निदर्शनास आल्याने लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होत आहे. रेल्वेगाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच त्यांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, दुसरीकडे लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. यातच आता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू – सीएसएमटी रेल्वेगाड्या ७ जुलैपर्यंत दादर स्थानकावरच स्थगित करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ च्या विस्तारीकरणाची कामे हाती घेतल्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या थांब्यावर परिणाम झाला आहे. या चार फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी, गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस या तिन्ही अतिजलद रेल्वेगाड्या ७ जुलैपर्यंत दादर स्थानकातच स्थगित करण्यात येतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा : मुंबई: अश्लील चित्रफीत तयार करून १७ लाखांची खंडणी, घाटकोपर पोलिसांकडून गुन्हा दाखल

उशिरा माहिती मिळाल्याने प्रवासी संतप्त

सीएसएमटी येथील ब्लॉकनंतर सर्व रेल्वेगाड्या सुरळीत धावतील. तसेच रेल्वेगाड्यांच्या डब्यात वाढ करण्याची घोषणा होईल, असा विश्वास प्रवाशांना होता. मात्र, ब्लाॅकनंतही प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच कोकणात जाणाऱ्या अतिजलद रेल्वेगाड्या दादरपर्यंत चालवण्याची माहिती उशिराने मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दादरपर्यंत रेल्वेगाड्या चालविल्याने, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले आणि सामान घेऊन प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहे, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा : केईएम रुग्णालयातील तंबाखू बंद क्लिनिक अद्ययावत होणार

रेल्वेगाडी उभी करण्यास फलाटाचा अभाव

शुक्रवारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते सीएसएमटी रेल्वेगाडी ६.३७ तास उशिराने धावली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. यातच ही रेल्वेगाडी ठाण्यापर्यंत चालवण्यात आल्याने, पुढील सीएसएमटीपर्यंतचा प्रवास कसा करायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडला. दरम्यान, सीएसएमटी येथे नाॅन इंटरलाॅकिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे रेल्वेगाडी उभी करण्यास फलाटाचा अभाव आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.