मुंबई : पूर्व मुक्त मार्गाचे आयुर्मान वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दोन्ही बाजूच्या रस्त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामांतर्गत आतापर्यंत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर ९ किमीचे, तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर दीड किमी अंतरावर डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुभाजकांवर व संरक्षक भिंतीवर रंगरंगोटी, तसेच रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्ग पालिकेला हस्तांतरित केला आहे. हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर देखभाल व दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी पालिकेकडे आली आहे. यासाठी रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. मुंबईमध्ये प्रथमच या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच धूळमुक्तीसाठीही विविध कामे करण्यात येत आहेत. साधारणपणे रस्ता पृष्ठीकरणासाठी डांबराचा ६ इंचाचा थर काढून त्यावर नवीन थर टाकला जातो. मात्र, ‘मायक्रो सर्फेसिंग’ या तंत्रज्ञानामध्ये डांबराचा रस्ता खराब होऊ नये, यासाठी सुमारे ६ ते ८ मिलिमीटरचे मजबूत आवरण केले जाते. यात एका दिवसात सरासरी १ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे शक्य असते. डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अवघ्या दोन तासांमध्ये रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करता येते. पूर्व मुक्त मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ‘मायक्रो सरफेसिंग’सह आवश्यक कामांसाठी मे महिन्यात कार्यादेश देण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात ही कामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता वाहतूक विभाग व आवश्यक परवानग्या प्राप्त करुन टप्प्या-टप्प्याने काम करण्यात येत आहेत. अल्पावधीतच ९ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण होवून आता दुसऱ्या बाजुचेही काम वेगाने सुरू आहे. तसेच इतर कामेदेखील केली जात आहेत. यात वडाळा व रे रोड येथील उतार मार्गाचा समावेश आहे.
पालिकेने यंदा दिवाळीनंतर पूर्व मुक्त मार्गावर दररोज रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत टप्प्या-टप्प्याने मुंबईच्या दिशेने येणारऱ्या बाजुचे ‘मायक्रो सरफेसिंग’ पूर्ण केले आहे. लवकरच दुसऱ्या बाजूचे काम पूर्णत्वास येईल. या तंत्रज्ञानामुळे रस्त्याचे आयुर्मान सुमारे ४ ते ५ वर्षांनी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या ठिकाणी धूळ व राडारोडा हटवून स्वच्छता केली जात आहे, असे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.