|| नीलेश पानमंद / किशोर कोकणे
कंपन्यांचा विलंब दंड टाळण्यासाठी ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक
मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा, खारेगाव भागात खड्डय़ांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि मालवाहन नियोजित वेळेत पोचत नसल्याने कंपन्यांनी सुरू केलेली दंडवसुली टाळण्यासाठी अवजड वाहने दोन टोल भरून ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक करू लागली आहेत. परिणामी, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रवेशद्वारांवरच प्रचंड कोंडी होत आहे.
मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा, खारेगाव भागातील प्रमुख मार्गावर खड्डे पडल्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा लागून कोंडी होऊ लागली आहे. ती टाळण्यासाठी २० ते २५ टक्के अवजड वाहने ऐरोली-आनंदनगरनाका मार्गे वाहतूक करू लागली आहेत. मालवाहन उशिरा पोहोचल्यास संबंधित कंपन्या मालवाहतूकदारांकडून दंड वसूल करीत आहेत. हा भरुदड टाळण्यासाठी अवजड वाहनचालक दोन नाक्यांवर टोल भरून ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरांच्या प्रवेशद्वारांवरच नोकरदारवर्ग कोंडीत अडकून पडत आहे. भिवंडी शहरातील बहुतांश गोदामे मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या गावांमध्ये आहेत. गोदामांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांचा माल ठेवला जातो. तो उरण जेएनपीटी येथून ठाणे-भिवंडीत आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. ते म्हणजे मुंब्रा-पनवेल, मुंब्रा बाह्य़वळण मार्ग आणि नवीमुंबई ऐरोली, आनंदनगर मार्ग. मुंब्रा-पनवेल, मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर टोलनाका नाही. त्यामुळे अनेक अवजड वाहने या मार्गाने प्रवास करतात. नवी मुंबई ऐरोली आणि आनंदनगर नाक्यावर दोन टोल नाके आहेत. या ठिकाणी दोन टोल भरावे लागत असल्याने अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करणे टाळतात. मात्र, मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा आणि खारेगाव भागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे अवजड वाहनांच्या रांगा लागून कोंडी होऊ लागली आहे. ती टाळण्यासाठी २० ते २५ टक्के अवजड वाहने ऐरोली-आनंदनगर नाकामार्गे वाहतूक करू लागली आहेत. ठाणे शहरातील महामार्गावर अवजड वाहनांचा भार वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर खड्डे
मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर खड्डे पडल्याने कोंडी होते. कोंडी आणि अपघात टाळण्यासाठीही वाहनचालक या मार्गावरून प्रवास करणे टाळत आहेत. तसेच या मार्गाला जोडणाऱ्या तर मुंबई-नाशिक महामार्गावरील माजीवडा नाका आणि खारेगाव टोलनाका येथेही खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून सकाळी आणि रात्री एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटे लागत आहेत.
वाहतूकदारांची शक्कल
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची वाहतूक करण्यासाठी ई-वे प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी वेळेची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत वाहन पोहचले नाहीतर त्यांना पुन्हा ई-वे प्रणालीद्वारे चलान तयार करावे लागते. शिवाय, वेळेत साहित्य पोहोचले नाही तर कंपन्या वाहतूकदाराकडून आठ हजार रुपये दंड वसूल करतात. मात्र, मुंब्रा बाह्य़वळण मार्गासह शीळफाटा तसेच खारेगाव भागातील रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अवजड वाहने कोंडीत अडकतात. त्यांना साहित्य वेळेत पोहोचवणे अशक्य होते. दंडाचा भरुदड टाळण्यासाठी चालकांनी ऐरोली-आनंदनगर या दोन टोलनाक्यांवरून प्रवास सुरू केला आहे.
साहित्य उशिरा पोहोचवल्यास संबंधित कंपनी आठ हजार रुपयांपर्यंत दंड घेते. याशिवाय, ई-वे प्रणालीद्वारे काढलेल्या चलनाची मुदत संपल्यावर ते पुन्हा काढण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी नवीमुंबई ऐरोली, आनंदनगर नाका मार्गे अनेक चालकांनी वाहतूक सुरू केली आहे. मुंब्रा-पनवेल मार्गावरील २० ते २५ टक्के वाहने ऐरोली-आनंदनगरमार्गे वाहतूक करीत आहेत. -अभिषेक गुप्ता, सचिव, बाँबे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन