मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक सेवा महत्त्वाची भूमिका पार पडेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. जगातील पहिल्या वडोदरा येथील व्यावसायिक सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली’ विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली उन्नत पॉडकार ही वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी, तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील दाट लोकसंख्या असलेल्या शहरात वापरण्याबाबत चाचपणी करण्याच्या उद्देशाने सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

नुट्रान इव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित तयार केलेली ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक व्यवस्था पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान २० प्रवासी बसू शकतात ६० ते ७० किमी प्रतितास या वेगाने या पॉर्डकार धावतात. ऑन बोर्ड विद्युत वाहने आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात. उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथील ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलात पहिल्यांदा ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक प्रकल्प राबविण्यास परवानगी दिली. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर, आता मीरा-भाईंदर आणि घोडबंदर परिसरात हा प्रकल्प राबविण्यासाठी लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport minister pratap sarnaik stated elevated podcar will be the innovative mode of transport of the future mumbai print news asj