मुंबई: देशातच नव्हे तर जगभर मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे ४२ कोटीहून अधिक लोक मधुमेहाने पीडित आहेत. भारतातही हा आकडा चिंताजनक असून सुमारे ७ कोटीहून अधिक रुग्ण या आजाराशी झुंज देत आहेत. मधुमेहामुळे शरीरातील जखमा वेळेवर भरून न येणे ही मोठी गुंतागुंत ठरते. अशा ‘डायबेटिक वुंड्स’मुळे अनेकदा संसर्ग वाढतो, उपचार दीर्घकाळ चालतात आणि गंभीर अवस्थेत काही रुग्णांना अवयवच्छेदनाचा धोका निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर भारतीय संशोधकांनी एक नवी व आशादायी दिशा दाखवली आहे. शिफ नाडर विद्यापीठ (दिल्ली-एनसीआर) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) भिलाई येथील संशोधकांनी गुलाबाच्या पाकळ्यांतील नैसर्गिक सूक्ष्म घटकांचा वापर करून मधुमेही जखमांच्या उपचारासाठी अभिनव व किफायतशीर तंत्र विकसित केले आहे. त्यांचा संशोधनप्रबंध अलीकडेच अमेरिकन केमिकल सोसायटीच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
या संशोधनात गुलाबाच्या पाकळ्यांमधून मिळणाऱ्या ‘रोझ-डिराइव्हड एक्स्ट्रासेल्युलर व्हेसिकल्स’ (आरइव्हीएस) आणि सूक्ष्म ‘कार्बन डॉट्स’ (सीडीएस) यांच्या साहाय्याने एक विशेष ‘हायड्रोजेल ड्रेसिंग’ तयार करण्यात आले आहे. हे ड्रेसिंग जखमेवर लावल्यास, दाह कमी होतो, ऊतकांची (टिश्यू) पुनर्निर्मिती वेगाने होते आणि जखमी भागातील रक्तपुरवठा सुधारतो, असे प्राथमिक निष्कर्ष सूचित करतात.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कार्बन डॉट्समुळे जखमेतील जंतूंची वाढ थांबवली जाते, तर आरइव्हीएस ऊतकांच्या वाढीस चालना देतात. या दोन घटकांच्या संयुक्त परिणामामुळे जखम लवकर भरून येण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर हे ड्रेसिंग शरीरासाठी सुरक्षित, जैवविघटनशील आणि पर्यावरणपूरक असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
सध्या ही तंत्रज्ञान-संकल्पना प्रयोगशाळा पातळीवर तपासली जात आहे. पुढील टप्प्यात प्राण्यांवरील आणि नंतर मानवांवरील वैज्ञानिक चाचण्या करून या उपचाराची सुरक्षितता व परिणामकारकता तपासली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास, गुलाबाच्या पाकळ्यांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक घटकांवर आधारित हे हायड्रोजेल ड्रेसिंग देशातील तसेच विकसनशील देशांतील लाखो मधुमेही रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.
आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे की, निसर्गातील साध्या घटकांमधून आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे हे संशोधन प्रेरणादायी उदाहरण आहे. आज जखमांवर वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम ड्रेसिंग्ज महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांपर्यंत ती पोहोचत नाहीत. अशा वेळी, गुलाबाच्या पाकळ्यांमधून मिळणारे हे किफायतशीर व परिणामकारक ड्रेसिंग रुग्णांच्या वेदना कमी करण्याबरोबरच त्यांच्यावरचे आर्थिक ओझेही हलके करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.संशोधन टीममधील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रयोग फक्त मधुमेही जखमांपुरता मर्यादित राहणार नाही तर भविष्यात भाजलेल्या जखमा किंवा दीर्घकाळ भरून न येणाऱ्या जखमांसाठीही हे तंत्र उपयुक्त ठरू शकते.जगभर वाढत असलेल्या मधुमेहाच्या भारात, ‘गुलाबातून मिळालेल्या उपचाराची ही नवी फुललेली दिशा’ अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरू शकते.
