मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) अखेर ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेच्या चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात केली. या चाचण्यांना मंगळवारपासून सुरुवात झाली असून विविध प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाचण्या आणि सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी दोन – अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना मे अखेरीसपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. संपूर्णत: भुयारी असलेल्या या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या प्रकल्पास विलंब झाला असून आता तीन टप्प्यात मार्गिका सुरू करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. तर आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या पूर्णत्वासाठी आतापर्यंत एमएमआरसीने अनेक तारखा जाहीर केल्या. शेवटच्या तारखेनुसार मे अखेरीस पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा दाखल करण्याच्यादृष्टीने अखेर आता एमएमआरसीने चाचण्यांना सुरुवात केली आहे.

हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात मेट्रो ३ च्या चाचण्यांना सुरुवात होणे अपेक्षित होते. तशी घोषणाही एमएमआरसीने केली होती. मात्र काही कारणांमुळे चाचणी रखडली. पण आता मात्र ही चाचणी मार्गी लागली आहे. मंगळवारपासून मेट्रो ३ च्या आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांनी दिली. मेट्रो गाड्या, डबे, सिग्नल यंत्रणा, रुळ आणि अन्य काही यंत्रणांची चाचणी करण्यात येईल.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्रातील निस्तेज काँग्रेसला राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा होणार का ?

‘सीएमआरएस’कडून चाचण्या

या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करण्यात येणार असून त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मेट्रो ३ चा पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता चाचण्यांना सुरुवात झाल्याने मे अखेरीस पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trial of subway metro 3 started travel by subway metro will be possible by the end of may mumbai print news ssb