दी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात शहीदांच्या आप्तांसह मुख्यमंत्री आणि नामवंतांचा सहभाग
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी ‘२६/११’च्या स्मृतीस्थळी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे दी इंडियन एक्स्प्रेसतर्फे फेसबुकच्या सहयोगाने शक्तीसंकल्पाचा जागर होणार आहे. त्या हल्ल्यात वाचलेल्या मुंबईकरांनी गेल्या नऊ वर्षांत दहशतवादाविरोधात जो अनाम लढा दिला त्याची कहाणी त्यांच्याचकडून ऐकण्याची ही संधी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन आणि चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि चित्रपट गीतकार प्रसून जोशी यांच्यासह अनेक नामवंत या संकल्पजागरात सहभागी होणार आहेत.
फिरोज अब्बास खान यांनी या कार्यक्रमाच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे. ‘द स्टोरीज ऑफ स्ट्रेंग्थ’ हा एक्स्प्रेस वृत्तपत्राचा अभिनव उपक्रम असून त्याचे हे दुसरे पर्व आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सामान्य नागरिकांचे तसेच शहीद झालेल्या पोलीस व जवानांचे आप्त यांना आपल्या मनातल्या वेदना आणि दहशतवादाविरोधात लढा देण्याची जिद्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच मांडता येणार आहे. त्यात नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा आणि या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी विजय साळस्कर यांची मुलगी दिव्या यांचे अनुभवकथन हे या कार्यक्रमाचा विशेष भाग आहे.
त्याचबरोबर ताजमहाल पॅलेस हॉटेलात त्या हल्ल्याचा समर्थ मुकाबला करताना पाच गोळ्या अंगावर झेलणारे आणि एक कान गमावणारे नौसेनेचे निवृत्त कमांडो जवान प्रवीण कुमार यांच्याशी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर संवाद साधणार आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प प्रवीण कुमार यांनी सध्या सोडला आहे.
या कार्यक्रमात वेगळ्या धाटणीचे संगीतकार अमित त्रिवेदी, गायक सुरेश वाडकर, प्रियांका बर्वे आणि शंकर महादेवन अकादमीतील विद्यार्थी, नौदलाचे बॅण्डपथक आणि अमृता फडणवीस हे आपली कलाही सादर करणार आहेत.
अनेक अज्ञात सत्यकथा प्रकाशात आणण्यासाठी..
दी इंडियन एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी सांगितले की, दहशतवाद आणि हिंसाचार याबाबत आधुनिक भारताच्या जनमानसाला संसदेवरील हल्ला आणि मुंबईवरील ‘२६/११’चा हल्ला, या दोन हल्ल्यांनी मोठे वळण दिले आहे. गेली ८० वर्षे भारतातील स्थित्यंतरांचा मागोवा घेणारा आणि त्यांची नोंद ठेवणारा वृत्तसमूह या नात्याने आम्हाला जाणवले की अशा हल्ल्यातून जे बचावतात त्यांच्याशी थेट संवाद नंतर क्वचितच साधला जातो. आम्ही घेतलेल्या अनेक मुलाखतींमधून जे गवसले ते हृदयस्पर्शी होते, प्रेरणा देणारे होते. त्यांच्यातली सकारात्मकता, जिद्द, परिपक्वता आणि मनाची विशालता ही थक्क करणारी होती. त्यातूनच हे जाणवले की अशा अनेक सत्यकथा आहेत ज्या लोकांसमोर अजूनही आलेल्या नाहीत. त्या प्रकाशात आणण्याची गरज आहे आणि एक जबाबदार वृत्तसमूह म्हणून त्या लोकांचे अनुभव जनतेसमोर आणणे हे आम्ही आमचे कर्तव्य आणि व्रतही मानतो.’’
‘खुल्या व्यासपीठा’वर आज शहिदांना श्रद्धांजली
मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटविणाऱ्या कलावंतांसाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात सुरू करण्यात आलेल्या ‘खुल्या व्यासपीठा’मध्ये ‘२६/११’च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कलावंत आपल्या कलेच्या रूपात शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे दर रविवारी अल्प दरात ‘खुले व्यासपीठ’ उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्या रविवारी या खुल्या व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले. हे ‘खुले व्यासपीठ’ मे २०१८ पर्यंत कलावंतांना उपलब्ध होणार आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील शहिदांना रविवारी ‘खुल्या व्यासपीठा’वर कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर बॉलीवूडचे संतोष मिजकर छोटेखानी कार्यक्रम साकारणार आहेत. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस २६/११च्या हल्ल्याच्या अनुषंगाने व्यंगचित्रे साकारणार आहेत. जे. जे. फाइन आर्टस्चे दोन विद्यार्थी विषयानुरूप चित्रे रेखाटणार आहेत. तसेच चित्रकार सुनील गोगिया, रुपाली मदन, प्रशासकीय अधिकारी वंदना कृष्णा आदी यात सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्याच्या विविध प्रकारांचे दर्शन मुंबईकर व देश-विदेशांतील पर्यटकांना घडावे या उद्देशाने हे ‘खुले व्यासपीठ’ सुरू करण्यात आले आहे. गेल्या रविवारी या ‘खुल्या व्यासपीठा’ला तब्बल १५ हजार जणांनी भेट दिली होती. दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने ‘खुल्या व्यासपीठा’वर उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.