मुंबई : परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्यांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी सरनाईक स्वतः बुधवारी पंढरपूरपर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार आहेत.

याबाबत माहिती देताना सरनाईक यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहू येथून प्रस्थान करणार आहे. १८ जून ते ५ जुलै दरम्यान संपूर्ण पालखी मार्गावर दिंडी सोबत परिवहन विभागाने तयार केलेल्या एलईडी स्क्रीन, फलकाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ सहभागी होणार आहे.

या पालखी मार्गावर विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि भक्तगण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून परिवहन योजनांची विशेषतः रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षण व प्रबोधन, सुरक्षित वाहन चालवणे अशा विविध योजनांची माहिती देण्यासाठी आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा अभिनव उपक्रम यंदापासून सुरू करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाच्या नियोजनासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी सरनाईक या पालखी मार्गाने पंढरपूरला जाणार आहेत.