मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे येथे २०२३ मध्ये आईडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबई विमानतळावरून अटक केली. हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयएसआयएस स्लीपर मॉड्यूलशी संबंधित असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.

अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही जकार्ता, इंडोनेशिया येथे लपून बसले होते आणि भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टी२) इमिग्रेशन विभागाने त्यांना अडवले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट्सही जारी केले होते. तसेच, दोघांवर माहिती देणाऱ्याला प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आणखी आठ आरोपी आहेत, जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सर्व आरोपी आयएसआयएसच्या विचारसरणीनुसार भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणून देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी होते. त्यांनी हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.

अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरातून त्यांनी स्फोटके तयार केली होती. २०२२ ते २०२३ या कालावधीत या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले गेले होते, तसेच त्यांनी बनवलेल्या आयईडीचे नियंत्रणीत स्फोट घडवून आणून त्याची चाचणीही घेतली होती.

या प्रकरणात एनआयएने याआधीच १० आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए), स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांना अटक झालेली आहे.

कोथरूड परिसरात १८ जुलै २०२३ रोजी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४) व इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यावरून हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता. या प्रकरणातील तपास अजूनही सुरू आहे.