मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठीची निविदा प्रक्रिया लांबल्याने पुनर्विकास लांबणीवर पडला होता. पण आता मात्र या पुनर्विकासासाठी दोन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या असून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मेसर्स जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि एएटीके कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून लवकरच म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाळ आर्थिक निविदा खुल्या करणार आहे. त्यानंतर पुनर्विकासाच्या निविदेत कोण बाजी मारते आणि पुनर्विकास मार्गी लावेल हे स्पष्ट होईल. तर दुसरीकडे निविदेस प्रतिसाद मिळाल्याने शक्य तितक्या लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याच्यादृष्टीने दुरुस्ती मंडळाने येथील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.

अंदाजे ३४ एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती, तसेच पीएमजीपी इमारती आहेत. तर ५२ इमारती कोसळल्या असून येथे १५ धार्मिकस्थळे, दोन शाळा, चार सरकारी कार्यालये आणि आठ इतर बांधकामे आहेत. कामाठापुरा येथे ६,०७३ निवासी आणि १,३४२ अनिवासी रहिवाशी आहेत. कामाठीपुरातील सर्व इमारती जुन्या झाल्या असून १९९० नंतर त्यांची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली आहे. आता हा इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडे सोपवली. त्यानुसार मंडळाने आराखडा तयार करून प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता घेतली. काही महिन्यांपूर्वी कन्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारुपानुसार अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेस काही कारणांमुळे अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आल्याने पुनर्विकास लांबणीवर पडला. पण अखेर आता निविदा खुल्या करण्यात आल्या असून दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

मेसर्स जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि एएटीके कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून त्यांची तांत्रिक छाननी सुरू आहे. छाननी पूर्ण करून लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर निविदेचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, ही प्रक्रिया पार पाडेपर्यंत रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्याचा निर्णय दुरुस्ती मंडळाने घेतला असून दोन दिवसांपासून बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. क्षितिज क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे येथे नेमकी किती घरे आहेत, किती रहिवासी आहेत, किती अनिवासी, निवासी गाळे आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.

रहिवाशांना मिळणार ५०० चौ. फुटांची घरे

कामाठीपुरा पुनर्विकासाअंतर्गत ८००१ रहिवाशांचे आणि ८०० जमीन मालकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. निवासी रहिवाशांना ५०० चौ. फुटांचे घर, तर अनिवासी रहिवाशांना २२५ चौ. फुटांचे गाळे देण्यात येणार आहेत. पुनर्वसित इमारती ५७ मजली असणार आहेत. त्याचवेळी विक्रीसाठीच्या इमारती या ७८ मजली असण्याची शक्यता आहे. लवकरच कामाठीपुरा परिसरात उत्तुंग इमारती उभ्या राहणार असून या परिसराचा कायापालट होणार आहे. दरम्यान, ८०० मालकांच्या मोबदल्याचे धोरणही राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार ५० चौ. मीटरपर्यंतची जागा असलेल्या मालकांना ५०० चौ. फुटांचे एक घर मिळणार आहे. तर ज्या मालकांची जागा ५१ ते १०० चौ. मीटर आहे त्यांना ५०० चौ. फुटाची दोन घर, ज्यांची जागा १०१ ते १५० चौ. मीटर आहे त्यांना ५०० चौ. फुटांची तीन घरे मिळणार आहेत. त्यापुढे जागा असलेल्यांना याच नियमानुसार घरे, मोबदला दिला जाणार आहे. याच धोरणानुसार कामाठीपुराचा पुनर्विकास म्हाडाकडून मार्गी लावला जाणार आहे.