नाराजीबाबत शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून पूर्वीच विचारणा ; आदित्य ठाकरे यांचा दावा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बंडाआधीच नाराजीबाबत विचारणा केली होती;

Aditya Thackeray
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेनेतील या बंडामुळे घाण निघून गेली आहे. बेइमान झालेल्यांना कदापि माफ करणार नाही; पण काही आमदारांना बळजबरीने नेण्यात आले आहे. असे जवळपास १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना पुन्हा शिवसेनेत घेऊ; पण फुटिरांचा निवडणुकीत पराभव करणारच, असा निर्धार पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

त्याच वेळी नाराजीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी नाराज नसल्याची ग्वाही दिली होती, असा दावाही आदित्य यांनी केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बंडाआधीच नाराजीबाबत विचारणा केली होती; पण त्या वेळी शिंदे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. ही गोष्ट मे महिन्यातील. महिनाभरातच शिंदे यांनी बंड केले. नाराज होते तर तेव्हाच का आपली भावना व्यक्त केली नाही? नंतर या लोकांनी गुजरातमध्ये जाऊन बंड केले. खरोखर यांच्यात ताकद, लाज, स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केले असते. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही म्हणून सुरतला पळाले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

पाहा व्हिडीओ –

संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान व नंतर सारवासारव

रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यावर संध्याकाळी राऊत यांनी सारवासारव केली. आमदारांनी आत्मा विकल्याने जे उरले ते केवळ त्यांचे जिवंत शरीर मृतदेहासारखेच आहे. आता त्यांचे विधानभवनात विच्छेदन होईल, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचा खुलासा राऊत यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray already asked shinde about his displeasure says aditya thackeray zws

Next Story
कायद्याचा दाखला देत शिवसेनेचा बंडखोरांना इशारा ; सर्वोच्च न्यायालयातील वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद  
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी