मुंबई : गणेशोत्सवासाठी मोफत एसटी सोडून गणेशभक्तांची सोय केली जाणार आहे. पण मुंबई-गोवा महामार्गावर इतके खड्डे पडले आहेत की हाडे खिळखिळी होणार आहेत. पण मुंबईत मंडपासाठी रस्ता खोदला तर पंधरा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत सरकार बुजवत नाहीत, तोपर्यंत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कोणीही पैसे भरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशमंडळांना केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश मंडळाची मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आपण आजही जल्लोषात कायम ठेवली आहे. पण या उत्साहाला कुठेही ओहटी लागली असे दिसलेली नाही. या सर्वकाळात अनेक संकटे आली, त्यातीत काही नैसर्गिक होती, काही सरकारीही होती. विशेषत: कोरोनाचा काळ भयानक होता. तो नसता तर मुख्यमंत्री म्हणून तुमचे प्रश्न त्याचवेळी सोडवून टाकले असते, असा विश्वास देत ठाकरे म्हणाले, त्यावेळी काही काळासाठी आपल्याकडे सत्ता होती, महापालिकाही सतत आपल्याकडे होती आणि यापुढेही ती आपल्याकडेच राहणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत आज आपल्याकडे सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरील तुमची ताकद आजही माझ्यासोबत कायम आहे, याचा मला कायम अभिमान राहील, असेही ठाकरे म्हणाले. आता मंडळांची पळावापळवी सुरू झाली आहे. पण गणपती बाप्पाचे आम्हाला आशीर्वाद आहेत तोपर्यत तुम्हाला कितीही मंडळे पळवा, आम्हाला कोणाची पर्वा नाही. पळविण्याशिवाय ते दुसरे काहीच करू शकत नाही. गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळे अशा आमिषाला बळी पडणार नाहीत आणि त्यांनी पडू नये, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.

पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडून अहवाल मागवला आहे. काकोडकर यांच्या अहवालाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. पर्यावरणाचे प्रेम कोणाकडून शिकायचे?, ज्यांनी अणुऊर्जेचे समर्थन केले त्या अनिल काकोडकर यांच्याकडून, असा सवाल करत म्हणजे कोकणात पर्यावरणाचा मोठ्याप्रमाणात र्हास होणार असून समुद्राचे तापमानही वाढणार आहे, म्हणून आपण त्यांना नाही सांगितले. पण आता त्यांना इथे पर्यावरण तज्ज्ञ म्हणून नेमत आहात आणि त्यांची दंडके आम्ही मानायचे, हा कोणता कारभार आहे, असा सवाल त्यांनी केला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत लवकर निर्णय घ्या!

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरकारने आणलेल्या निर्बधांवर उद्धव ठाकरे यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसला पर्याय शाडूची माती आहे, पण ती देणार कोण, मूर्ती किती उंचीची पाहिजे? हे प्रश्न अनुत्तरित ठेवून दरवर्षी मंडळांना तुमच्या दारात यायला का लावता असा सवाल त्यांनी सरकारला केला. मार्चपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील निर्बंध उठवले गेले नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.