मुंबई : महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट आहे. राजकारण न आणता एखत्र येऊन मार्ग काढण्याची विनंती सरकारला केली. मुख्यमंत्री जाहिरातींत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटांवर आपले फोटो लावण्यात व्यस्त आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर पडला असून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. साखर सम्राटांच्या कारखान्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे कर्ज सरकार भरणार आहे. आता शेतकऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कर्जमाफी जाहीर होणार का, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेले पत्रच पत्रकार परिषदेत वाचून दाखविले. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती तर आता ओला दुष्काळाची संज्ञा कशी बदलू शकते, असा सवाल त्यांनी केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या १५ रुपयांवरुनही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असे एकूण टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने एकीकडे शेतकऱ्याचाच खिसा कापत दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याचा कार्यक्रम सुरू केल्यावरूनही ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. सरकारने साखर सम्राटांसाठी माफी दिली, आम्ही गोरगरीब शेतऱ्यांसाठी मागणी करतोय. ज्या शेतकऱ्यांवर आपली जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आलेली असते. सध्या पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबून गेले आहेत, त्यांना तत्काळ मदतीची आवश्यकता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
फडवणवीसांकडून ओल्या दुष्काळाची तेव्हा मागणी
देवेंद्र फडणवीस यांचे १६ ऑक्टोबर २०२० रोजीचे पत्र वाचून दाखवताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी असतानाच वेदना होतात का, मुख्यमंत्र्यांना होत नाहीत, मात्र मला झाल्या. म्हणून मी कर्जमुक्ती केली, असे ते म्हणाले. मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट कसे नाकारू शकता. ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल म्हणून तुम्ही झालेले नुकसान नाकारू शकता का? काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का, असाही सवाल त्यांनी केला.
केंद्राचे पथक अद्याप राज्यात पोहोचले नाही. पंचनामे वगैरे फालतू शब्दांचा खेळ करू नये. पाहणी करून पंचनामे करून, निर्दयपणाने सगळे सुरू आहे. ओला दुष्काळ म्हणा की, अकलेचा दुष्काळ म्हणा, मात्र शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे निवारे पाण्यात वाहून गेले आहेत, घरात ४८ तास पाणी राहिले पाहिजे, हा कोणता निकष? शेतकऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून दिलीच पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्र सरकार मदतीच्या प्रस्तावाची का वाट पाहतेय
बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना १० हजार रुपये महिना दिले जात असल्याबाबत विचारले असता देशातील ८० कोटी लोकांना पंतप्रधान फुकटात अन्नधान्य देतात, पण जो हे सगळे पिकवतो तो आज उघड्यावर आला आहे. बिहारमध्ये १० हजार रुपये देताना कोणत्या प्रस्तावाची वाट पाहिली होती का, तेव्हा आज इथेही अन्नदात्याला मदत जाहीर करताना केंद्र सरकार का वाट पाहतेय? दिल्लीत जाऊन केवळ मुजरा करू नका, तर शेतकऱ्यांसाठी मदत आणा, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
शिवसेनेच्या मेळाव्याचे बिल पाठवतो
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटी रुपये खर्च होतात, असा दावा भाजपकडून करण्यात आला. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेे. दसरा मेळाव्याचे बिल मी त्यांच्याकडे पाठवतो. त्याचे मला पैसे आणून द्या, असे त्यांनी सांगितले.