मुंबई : गणिताच्या पदवी अभ्यासक्रमात नारदीय पुराणातील उदाहरणे, पंचागानुसार कालगणना, गणित आणि ध्यान अशा संकल्पनांचा समावेश करण्यात आला असून त्याला देश-विदेशातील गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञांनी विरोध केला आहे. कला आणि विज्ञान शाखेसाठी नवा अभ्यासक्रम आराखडा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.

देशातील पद्म पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक विजेत्यांसह परदेशातील ९०० हून अधिक गणितज्ज्ञ, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांनी आयोगाकडे याचिकेद्वारे केली असून हा मसूदा मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने ऑगस्टमध्ये आयोगाने बीए आणि बीएससी गणितासाठी तयार केलेल्या मसुद्यात वैदिक गणित, भारतीय बीजगणित, पुराणे आणि प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या कल्पना यासारख्या संकल्पनांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना नारद पुराणातील भूमितीचे उदाहणे, पंचांग वापरून मोजल्या जाणाऱ्या विधिंमध्ये मुहूर्त आणि जगातील प्रमाण वेळ मोजण्यासाठी असलेल्या ग्रीनविच मीन टाईमसारख्या समकालीन प्रणालींच्या तुलनेत प्राचीन भारतीय वेळेसाठीची एकके शिकवली पाहिजेत, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना भारतीय बीजगणिताचा इतिहास आणि उत्क्रांती यांसह बहुपदी भागाकारासाठी परावर्त्य योजना सूत्र अशा जुन्या सूत्रांचा वापर शिकवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गणितज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञांनी या मसुद्याला विरोध केला आहे. देशातील २० पद्म पुरस्कार विजेते आणि शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त व्यक्तींसह परदेशातील जवळपास ९०० तज्ज्ञांनी या मसुद्याला विरोध करणारी याचिका आयोगाला पाठविली आहे.

संशोधन आणि संधींवर परिणाम

मसुद्यात असलेल्या काही मूलभूत त्रुटींमुळे गणित शिक्षणावर आणि त्यातील संशोधनावर विपरित परिणाम होऊ शकतो. देशभरातील संशोधन आणि उद्योगाची गुणवत्ता कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘गणित आणि ध्यान’ अशा विषयांचा पदवी अभ्यासक्रमात काहीही संबंध नसतानाही अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण किंवा उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींपासून वंचित राहावे लागेल, ‘गणित आणि भौतिकशास्त्र’ किंवा ‘गणित आणि ध्यान’ यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये दिलेले संदर्भ ग्रंथ अस्तित्त्वातच नाहीत.

अभ्यासक्रम गांभीर्यांने तयार करण्यात आलेला नाही, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. भारतात सध्या अनेक गुणवान गणितज्ज्ञ आणि शिक्षक आहेत. त्यामुळे भारतीय गणित परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या गरजा यांचा समतोल राखणारा अभ्यासक्रम तयार करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी निवेदनात केली आहे. यूजीसीने हा मसुदा मागे घेऊन नव्या अभ्यासक्रमासाठी पात्र आणि अनुभवी गणित तज्ज्ञांची समिती तयार करावी, अशी मागणी आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

कुणाचा विरोध?

चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट, बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, आयआयटी मुंबई, अशोका विद्यापीठ, शिव नादर विद्यापीठ, कोलकाता येथील आयआयएसईआर आणि इंडियन स्टॅटिस्टिक्स इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांमधील गणिताच्या शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे.