लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सेतूच्या पाण्याखालील सर्व खांबांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी केली जाणार आहे. खोल समुद्रात वर्षानुवर्षे खांब असल्याने खांबांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खांबांची दुरूस्ती करणे किंवा त्यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने एमएसआरडीसीने सेतूच्या खांबांच्या तपासणीसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर आवश्यक ती दुरूस्ती किंवा बदल केले जाणार आहेत.

मुंबईतील वाहतुक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा ५.६ किमीचा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन १५ वर्षे झाली. खोल समुद्रात या सेतूचे खांब असल्याने तीन ते पाच वर्षाच्या काळात सर्व खांबांची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करुन घेणे सेतूच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे असते. त्यानुसार आतापर्यंत सागरी सेतूवरील पथकर वसूलीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराकडूनच खांबांची तपासणी केली जात होती. आता पहिल्यांदाच एमएसआरडीसीकडून खांबांची दुरूस्ती केली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही दुरूस्ती केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा रस्ते धुण्याचा प्रयोग, शंभर टँकर तैनात

पाण्याखालील खांबांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार खांबांची दुरूस्ती किंवा आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित असून या तपासणीसाठी नुकतीच एमएसआरडीसीकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underwater pillars of bandra worli sea link inspected using cutting edge technology mumbai print news mrj