मुंबई : ऐतिहासिक वारसा आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा १६९ वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी शुक्रवार, १८ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने अवलंबलेल्या युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क – विद्यापीठ विभाग क्रमवारी आराखडा) पुरस्कार, प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. ‘युडीआरएफ’अंतर्गत एकूण ७ वर्गवारीतून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान वर्गवारीतून रसायनशास्त्र विभागाने प्रथम पारितोषिक पटकावले असून त्यांना सर्वाधिक १५ लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या विभागास ७ लाख रुपये अनुदानाचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
व्यवस्थापन, उपपरिसरे, आदर्श महाविद्यालये आणि संस्था या वर्गवारीत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन शिक्षण संस्थेला १० लाख रुपयांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक पटकावणाऱ्या गरवारे व्यवसाय व विकास संस्थेला ५ लाख रुपयांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय व परदेशी भाषा विभाग वर्गवारीत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या जर्मन भाषा विभागाला १० लाख रुपयांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक पटकावणाऱ्या संस्कृत विभागाला ५ लाख रुपयांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले. प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांमध्ये केंद्रीय मूल्यांकन प्रक्रिया विभाग, वित्त व लेखा विभाग, शैक्षणिक नियुक्त्या आणि गुणवत्ता हमी, दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृह आणि अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन संस्था या प्रशासकीय विभागांना सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार १ लाख रुपयांचे अनुदान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नीतिन करमळकर आणि सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत यांनी वर्धापन दिन व्याख्यानमालेचे ११ वे पुष्प गुंफले. प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसास कारंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले की, ‘मुंबई विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी, गौरवशाली आणि वैभवसंपन्न परंपरेसाठी आपल्या सर्वांना प्रयत्नशील राहावे लागणार आहे. विद्यापीठाचे जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी सर्व भागधारकांना कटिबद्ध राहावे लागणार आहे’. तर युडीआरएफसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्रा. नीतिन करमळकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे आव्हान म्हणून बघण्यापेक्षा संधी म्हणून पाहावे, तसेच सर्वांनी एकसंघपणे आणि एकरुपाने काम करावे, असेही प्रा. करमळकर यांनी सांगितले. तर प्रा. राजनीश कामत यांनी युडीआरएफ आणि प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कार हे विद्यापीठाला जागतिक दर्जाच्या क्रमवारीत उभे राहण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे सांगितले. स्थापना दिनाचे औचित्य साधून प्राचार्य माधव राजवाडे आणि प्रा. प्रकाश मसराम संपादीत ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.