मुंबई : राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे.
राज्यभरात चार दिवसांत एकूण १ लाख १९ हजार २५५ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. गत तीन-चार दिवसांतील या पावसाचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे.
रत्नागिरीत ४११ हेक्टर, रायगडमध्ये २,८०८ हेक्टर, पालघरमध्ये १,३९२ हेक्टर, सिंधुदुर्गमध्ये १,२७१ हेक्टर आणि ठाण्यात १४,४६२ हेक्टरवरील भात, नाचणी, वरई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. ही माहिती प्राथमिक नजरअंदाजे असून, नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील नुकसानीसह पुण्यात ३५० हेक्टरवरील भात, कांदा, भाजीपाला पिके; नाशिकमधील ४८,३२४ हेक्टरवरील भात, मका, कापूस, सोयाबीन, कांदा, बाजरी, भाजीपाला; धुळ्यातील ४८,२८० हेक्टरवरील भात, मका, कांदा, बाजरी, तूर, फळपिके; नंदुरबारमधील ८३२ हेक्टरवरील भात, ज्वारी, सोयाबीन, मिरची; जळगावातील ९१३ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी आणि बुलढाण्यात आठ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.
किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कापणीला आलेला भात भिजला आहे. सतत तीन-चार दिवस पाऊस झाल्यामुळे भाताला कोंब आले आहेत. भात भिजल्यामुळे कापणी रखडणार आहे. किनारपट्टीवर हळव्या भाताची काढणी झाली आहे, पण गरवा (उशिराने पक्व होणारा) भात हातचा गेला आहे.
सध्या किनारपट्टीवर भातकापणीची लगबग सुरू असतानाच अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांसह नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पूर्व विदर्भात भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.
जिल्हानिहाय नुकसान
रत्नागिरी- ४११ हेक्टर, रायगड- २,८०८ हेक्टर, पालघर- १,३९२ हेक्टर, सिंधुदुर्ग- १,२७१ हेक्टर, ठाणे- १४,४६२ हेक्टर, पुणे- ३५० हेक्टर, नाशिक- ४८,३२४ हेक्टर, धुळे- ४८,२८० हेक्टर, नंदुरबार- ८३२ हेक्टर, जळगाव- ९१३ हेक्टर, बुलढाणा- ८ हेक्टर.
