मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी तात्पुरता जामीन मंजूर केला. सप्टेंबर २०२० मध्ये अटक झाल्यापासून गायचोर हे वयोवृद्ध वडिलांना भेटलेले नाहीत, असे नमूद करून न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी गायचोर यांना तात्पुरता जामीन मंजूर केला. न्यायालयाने गायचोर यांना ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाने तात्पुरत्या जामिनाची मागणी फेटाळल्यानंतर गायचोर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७५ वर्षांच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, त्यांना भेटण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी गायचोर यांनी याचिकेद्वारे केली होती. या प्रकरणातील अन्य सह-आरोपींनाही यापूर्वी अशाच कारणांसाठी तात्पुरता किंवा अंतरिम जामीन मंजूर केल्याचेही गायचोर यांनी जामीन मागताना नमूद केले होते. तथापि, आपल्या प्रकरणात वस्तुस्थितीचा विचार करण्यात विशेष न्यायालय अपयशी ठरले आहे. विशेष न्यायालयाने आजारी वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यामागील मानवतावादी दृष्टीकोन विचारात घेतला नाही, असा दावाही गायचोर यांनी केला होता.