मुंबई : विविध अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आणि विशिष्ट अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. यापैकी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकण्याकडे असतो.ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावासातर्फे अमेरिकी विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवार, ८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत झूम ॲपवर ऑनलाईन पद्धतीने विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

अमेरिकी विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शनपर सत्र निःशुल्क असून पुढील संकेतस्थळावर नावनोंदणी करणे बंधनकारक आहे : https://bit.ly/2025VisaSessions तसेच नावनोंदणी करताना ‘आय – २०’ अर्ज किंवा अमेरिकेच्या विद्यापीठातील प्रवेश अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. या सत्रात अमेरिकी वाणिज्य दूतावासातील अधिकारी अमेरिकी विद्यार्थी व्हिसासाठी नेमका अर्ज कसा करावा ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांनाही अमेरिकी विद्यार्थी व्हिसासह अमेरिकेतील शिक्षण पद्धतीसंदर्भातील विविध प्रश्न विचारता येतील.