मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवरील मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असून मिशन रफ्तारअंतर्गत मुंबई – सुरत – वडोदरा – दिल्ली आणि मुंबई – वडोदरा – अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांमध्ये रेल्वेगाड्या ताशी १६० किमी वेगाने धावणार आहेत. त्यामुळे लवकरच पश्चिम रेल्वेवरील पहिली मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावण्यास सज्ज होणार आहे. मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मुंबई – दिल्ली दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरण : देशभरात १३ ठिकाणी ईडीचे छापे

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात रेल्वेगाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत रेल्वेगाड्याचा वेग ताशी १६० किमीने वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा लोखंडी तारा लावणे सुरू आहे. यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येतील. मुंबई – अहमदाबाद या ६२२ किमी रेल्वे मार्गापैकी ५६२ किमी रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्यात आले आहे. उर्वरित रेल्वे मार्गावर कुंपण उभारण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या कामासाठी एकूण २६४ कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच रेल्वे रूळांचे मजबूतीकरण, ओव्हर हेड वायर आणि सिग्नलिंग यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> शेकोटी, पालापाचोळा जाळल्यामुळे देवनारमधील हवा प्रदूषित

‘मिशन रफ्तार’ प्रकल्पासाठी अंदाजे ३,९५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र यामुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा प्रवास वेगवान होईल.

मुंबई – दिल्ली रेल्वे मार्गाच्या एकूण १,३७९ किमीपैकी ५० टक्के भाग पश्चिम रेल्वेअंतर्गत येतो. साधारणपणे मुंबई सेंट्रल – नागदापर्यंत (६९४ किमी) उर्वरित भाग पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर रेल्वेमध्ये विभागला आहे. इतर विभागीय रेल्वे देखील मार्च २०२४ अखेर ‘मिशन रफ्तार’ प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्रमुख अभियांत्रिकी सुधारणांमध्ये जिओ सेलचा वापर करून पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत १२६ पुलांच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat will run at 160 kmph on western railway mumbai print news zws