मुंबई : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. गुणवंतराय गणपतलाल पारिख यांचे गुरुवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आयुष्याची शंभरी पार केलेल्या डॉ. जी. जी. पारिख यांनी आजवर महात्मा गांधींची विचारसरणी अनुसरून वाटचाल केली आणि त्याच महात्म्याच्या जयंतीदिनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता, त्यानुसार त्यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी जे. जे. रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा चालताबोलता इतिहास आणि समाजवादी मूल्यांची रुजवात करणारा लढवय्या विचारवंत हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.
गांधीवादी चळवळीतील अखेरचा शिलेदार म्हणून डॉ. जी. जी. पारिख यांची गणना होते. शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिलेल्या पारिख यांना आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसांत वृध्दापकाळामुळे का होईना उपचारासाठी पडून राहावे लागते, हा विचार टोचणी देत होता. महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार खादीचे पुनरुज्जीवन, वंचित – दुर्बल घटकांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देण्यातून त्यांना स्वावलंबी बनवणे, स्वत:ची वैद्यकीय सेवा सांभाळून दूर खेडोपाड्यातील आदिवासी-गरीबांना उपचार मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणे अशा विविध स्वरुपातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. अगदी गेल्यावर्षी मे महिन्यात सर्वात तरुण वयाचा हा मतदार व्हीलचेअरवरून मतदानासाठी केंद्रापर्यंत पोहोचला होता. यावर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांना १०१ वर्ष पूर्ण झाली असती, मात्र त्याआधीच त्यांनी या इहलोकाचा निरोप घेतला. त्यांचे पार्थिव शनिवारी दुपारपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ताडदेव येथील जनता केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार देहदानासाठी त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झालेले, ऐन तारुण्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळीत स्वत:ला झोकून दिलेले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात रुजणाऱ्या लोकशाही व्यवस्थेचे साक्षीदार असलेले फार मोजके विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी आज हयात आहेत. डॉ. जी. जी. पारिख हे त्या शेवटच्या पिढीतील अग्रणी लढवय्ये होते. गुजरातमध्ये ३० डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या जीजी यांचे शिक्षण सौराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईत झाले. वैद्यकीय पदवी घेतलेल्या जीजींना वयाच्या आठव्या वर्षी महात्मा गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली होती. गांधीजींच्या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेले असताना त्यांनीही स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. जयप्रकाश नारायण, लोहिया, युसूफ मेहेर अली आणि इतरांबरोबर त्यांनीही १९३४ साली ‘काँग्रेस सोशलिस्ट पार्टी’च्या स्थापनेत सहभाग घेतला होता. गांधीजींनी १९४२ साली पुकारलेल्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी उडी घेतली आणि त्यांना तुरुंगवासही झाला. पुढे आणीबाणीच्या काळातही त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. विद्यार्थी चळवळ, कामगार संघटना, सहकार चळवळ या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
जीजींचा गांधीवादी आणि समाजवादी विचारसरणीवर गाढ विश्वास होता, त्यांनी कधीही समाजवादी मूल्यांशी फारकत घेतली नाही. समाजातील असमानता दूर करणे, वंचित आणि दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यासाठी रोजगारनिर्मिती करणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. आणि १९६१ साली रायगड जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या ‘युसूफ मेहेरअली सेंटर’च्या माध्यमातून त्यांनी ही उद्दिष्टे जपत समाजकार्याचा घेतलेला वसा शेवटपर्यंत जपला. आज ‘युसूफ मेहेरअली सेंटर’, ‘युवक बिरादरी’च्या माध्यमातून देशभरात त्यांचे कार्य विस्तारले आहे. तेल घाणी, साबण बनविणे, मातीची भांडी – खेळणी बनविणे, सुतारकारम, डेअरी, गांडुळ खत प्रकल्प, सेवाग्राम अशा विविध माध्यमांतून त्यांनी वंचितांसाठी रोजगारनिर्मिती केली.
याशिवाय, तीन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुलींसाठी वसतीगृह, रायगड जिल्ह्याप्रमाणेच गुहागर येथेही रुग्णालय उभारून समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, वैद्यकीय सेवा, रोजगार मिळवून देण्यासाठी ते कार्यरत राहिले. गुजरातमध्ये २००० साली झालेल्या भूकंपानंतर निर्वासितांसाठी घरे, मुलांसाठी वसतिगृहे, दवाखाना उभारण्याबरोबरच जम्मू काश्मीर, तमिळनाडू, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम अशा विविध राज्यांमध्येही त्यांनी महिला, आदिवासी यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबवले. समाजासाठीच कार्यरत राहण्याचा घेतला वसा निष्ठेने जपणाऱ्या जीजींसारख्या थोर व्यक्तिमत्वाचे कार्य, त्यांच्या वैचारिकतेचा, समाजनिष्ठेचा वारसा कधीही संपणार नाही. हा विचारवारसा त्यांनी उभारलेल्या कार्यातून, समाजात पेरलेल्या विचारांमधून कायम पुढे जात राहील.