शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत अपेक्षित आहे. एकगठ्ठा मराठी मतदार असलेल्या या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मतांच्या बेगमीसाठी चुरस दिसू शकेल.

पूर्व उपनगरे शहराशी जोडणारा लालबहादूर शास्त्री मार्ग पूर्वी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जात होता. भांडुपमध्येही मोठय़ा कंपन्या, कारखाने, छोटी-मोठी औद्योगिक संकुले होती. या कारखान्यांमध्ये काम करणारा कुशल-अकुशल कामगार वर्ग भांडुपमध्ये वसला. येथे सुमारे ७० टक्के लोकसंख्या मराठी असून त्यात कोकणातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या आणि इथेच वसलेल्या चाकरमान्यांचे प्राबल्य आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेत मोठमोठी गृहसंकुले उभी राहात असून तेथे वास्तव्यास आलेले मात्र बहुभाषिक आहेत.

गतनिवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पार पडलेल्या या लढतींमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट कायम होती. त्याचा फायदा घेत भांडुपमधून भाजपतर्फे लढलेले मनोज कोटक (सध्या खासदार) यांनी ४३ हजार मते घेऊन शिवसेनेला घाम फोडला. मात्र भाजपसाठी पोषक वातावरण असूनही सेनेचे उमेदवार अशोक पाटील यांनी ४८ हजार मते घेत भांडुपचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले. मनसेचे विद्यमान आमदार शिशिर शिंदे यांनीही ३६ हजार मते घेत लढतीतली चुरस कायम ठेवली.

यंदा युतीतर्फे शिवसेनेचे नगरसेवक, विभागप्रमुख रमेश कोरगावकर रिंगणात आहेत. गेल्या दोन लढतींमध्ये आयत्या वेळी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतरही ते पक्षासोबत राहिले. भांडुपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता, अशी ओळख असलेल्या कोरगावकर यांनाच उमेदवारी मिळावी ही मागणी यंदा भांडुपमधील शिवसैनिकांनी मातोश्रीवर प्रभावीपणे मांडली. सेना-भाजप युती कोरगावकर यांच्यासाठी पोषक ठरू शकेल.

महापालिकेच्या गत चार निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडून आल्याने कोरगावकर यांची विधानसभेच्या निम्म्या मतदारसंघात ओळख आहे. त्यांच्यासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांचे आव्हान असेल.

भांडुप सोनापूर, भांडुप गाव परिसरातील बहुभाषिक वस्तीवर कोपरकर यांचा प्रभाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे बरेच पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी पक्षांतर करत सेना, भाजपची कास धरली. अलीकडेच राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांनी सेनेत प्रवेश केला. गत लढतीत काँग्रेसतर्फे लढलेले माजी आमदार शाम सावंत स्वाभिमान पक्षासोबत आहेत. त्यामुळे भांडुपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी नाही. त्याचा फटका कोपरकर यांना बसू शकेल. असे असले तरी कोरगावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन रोखावे लागेल. येथून मनसेतर्फे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर रिंगणात आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे २००७च्या महापालिका आणि २००९च्या विधानसभा लढतींत

भांडुपमधून मनसेला प्रचंड मते मिळवता आली. कालांतराने ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाली. त्याचा परिणाम पुढल्या निवडणुकांमध्ये दिसून आला. मात्र यंदाच्या लढतीत ठाकरे यांनी प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका मांडल्यावर काही प्रमाणात मतदारांची सहानुभूती मनसेला मिळू शकेल, अशी परिस्थिती आहे. त्यातच काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाभाऊ कराडकर यांनी मनसेत प्रवेश केला आहे. त्यांनी जळगावकर यांना काही अंशी बळ मिळू शकेल. मात्र येथील मनसे पदाधिकाऱ्यांचे गट एकत्र आणण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागेल.

मनसेमुळे येथील मराठी मतांची विभागणी होणार असली तरी लोकसभा, विधानसभा लढतींत सेना-भाजपने घेतलेल्या मतांची बरोबरी करणे जळगावकर यांना शक्य होईल का, हा सध्या येथील चर्चेचा विषय आहे.

मतदारांची अपेक्षा

  •  भांडुपमधील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना
  •   रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावावेत, नवे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत
  •   येथील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी लोकप्रतिनिधीने सदैव क्रियाशील असावे
  •   भांडुपमध्ये शासनाचे सुसज्ज रुग्णालय, अग्निशमन केंद्र, लोडशेडिंग समस्येतून सुटका व्हावी