मुंबई : कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांना प्रशासन आणि पोलीस यांच्या दडपशाहीबद्दल माहिती दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले, तर प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातल्याचे सांगण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारसू येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले होते. पोलिसांनी सत्यजित चव्हाण यांच्यासह संघर्ष समितीच्या ४० कार्यकर्त्यांना अटक केली होती.  सुटका झाल्यावर चव्हाण यांनी पवार यांची भेट घेतली. या वेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. या भेटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या अत्याचाराची माहिती आपण पवार यांना दिली. तसेच शरद पवार यांनी बारसूला भेट द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली असता त्यावर विचार करण्याचे आश्वासन पवारांनी दिले, असे चव्हाण यांनी सांगितले.

बारसू विरोधकांच्या भावना शरद पवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना दूरध्वनीद्वारे कानावर घातल्या. त्यावर सामंत यांनी महाराष्ट्र दिनानंतर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही चर्चा करण्याचे आश्वासन पवारांना दिले.

७० टक्के पाठिंब्याचा दावा खोटा : चव्हाण

बारसू आणि परिसरातील ८ ते १० गावांतील ग्रामस्थांचा या प्रकल्पास विरोध आहे. ७० टक्के ग्रामस्थांचा या प्रकल्पास पाठींबा असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र हे खरे नाही. सरकारने या दहा गावांतील ग्रामस्थांची मते जाणून घ्यावीत, मग सत्य समजेल. प्रकल्पाला आमचा विरोधच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलक महिलांना मारहाण केली आणि ग्रामस्थांना तालुकाबंदीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers opposing barsu refinery project meet ncp chief sharad pawar mumbai print news zws