मुंबई : दोनशे वर्षाचा इतिहास संशोधनाचा वारसा असलेल्या ‘फोर्ट’मधील ‘दि एशियाटिक सोसायटी’या प्रतिष्ठीत संस्थेच्या ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा गुरुवार अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या निवडणुकीत नेमके मतदार किती यासदंर्भात संभ्रम असून उद्या होणाऱ्या धर्मादाय आयुक्त यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्च अखेर संस्थेचे ३ हजार ६३८ सभासद होते. या संस्थेत सभासद झाल्यास लागलीच येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचाही हक्क मिळतो. याचा लाभ उठवत संस्थेवर वर्चस्वी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांशी संबंधित अभ्यासक-कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी सभासद वाढवण्याची जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे मार्चनंतर १८०० नवीन सभासदांची भर पडली आहे. सभासद संख्या विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून नोंदवल्याबाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तीन तक्रारी दाखल आहेत.
८ नोव्हेंबरच्या मतदानास पात्र सभासद कोण यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे उद्या सुनावणी आहे. आयुक्त जो निकष सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदार याद्या तयार ठेवणार आहोत, असे निवडणूक निर्णय अधिकारी गिरीधर शेट्टी यांनी सांगितले. अध्यक्ष एक जागा, उपाध्यक्ष ४, सचिव एक, व्यवस्थापन समिती ६, कर्मचारी प्रतिनिधी २ आणि छाननी समिती ७ जागा अशा १९ जागांवर मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस हाेता.
अध्यक्षपदासाठी कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धे या दोन माजी खासदारांमध्ये दुरंगी लढत आहे. उपाध्यक्ष पदाच्या जागा चार असून त्यासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’चे ए.डी. सावंत, ‘रिपाइं’ नेते व कवी अर्जुन डांगळे, मराठी भाषा केंद्राचे दिपक पवार, ‘साप्ताहीक विवेक’चे माजी संपादक रमेश पतंगे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु संजय देशमुख आदी नामांकीत व्यक्ती उमेदवार आहेत. तर व्यवस्थापकीय समितीच्या सहा जागा असून पत्रकार इब्राहीम अफगाण, सामाजिक कार्यकर्त्या कुंदा निळकंठ, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, लेखिका सुनंदा भोसेकर अशी १६ मंडळी निवडणुकीच्या मैदानात आहेत.
-निवडणुकीला वेगळाच रंग
मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत फक्त १६८ मतदारांनी मतदान केले होते. यंदा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक चर्चेत आहे. उजव्या विचारांचे अभ्यासक-कार्यकर्ते विरुद्ध पुरोगामी अभ्यासक-कार्यकर्ते अशी लढाई यावेळी आहे. पारशी-बोहरींचे संस्थेवरील वर्चस्व संपवा, असा एक गट प्रचार करत असून ‘एशियाटिक’चे भविष्यातील भगवीकरण रोखण्यासाठी मतदानाला या… असा दुसऱ्या गटाने प्रचार सुरु केला आहे.
