मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा सोमवारी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला. प्रभाग रचना आराखडा अंतिम झाल्यानंतर आता मतदार यादी आणि आरक्षण याकडे राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी लवकरच निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मतदार यादीसोबतच आरक्षणाच्याही तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा सोमवारी जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारुप आराखड्यावर नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवरील सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने हा आराखडा अंतिम केला आहे. अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. प्रभाग आराखड्यानंतर आता मतदार यादी तयार करणे आणि आरक्षणाच्या कामांना वेग येणार आहे.

मतदार यादीसाठी लवकरच वेळापत्रक जाहीर होणार

मतदार यादी तयार करण्यासाठी लवकरच निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी तीन आठवड्यांचा काळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मतदारयादीवर हरकती व सूचना घेऊन मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. तसेच सोबत आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभेची मतदार यादी विभाजित करावी लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र ठरवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. मात्र १ जुलैपर्यंतची मतदार यादी विधानसभा मतदारसंघनिहाय आहे. ती प्रभागनिहाय करावी लागणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच ते सहा प्रभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यादी पाच प्रभागात विभागावी लागणार आहे. त्याकरीता संगणकीय मदत घेतली जाणार आहेच, पण प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करूनही यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे यासाठी वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा प्रभागात बदल …

प्रभाग आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेकडे तब्बल ४९४ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या ४९४ हरकती व सूचनांवर सप्टेबर महिन्यात सुनावणी पार पडली. महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फत ही सुनावणी घेण्यात आली. या हरकती व सूचनांपैकी ३०७ तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत. तरीही हरकती व सूचनांचा मात्र पाऊस पडला. हरकती व सूचनांनुसार २२७ पैकी ६ प्रभागात काही मोजके बदल करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामध्ये पूर्व उपनगरातील दोन, तर पश्चिम उपनगरातील चार प्रभागांचा समावेश आहे. प्रभागांमधील काही भाग दुसऱ्या प्रभागांमध्ये दाखवण्यात आला होता. त्यावर रहिवशांनी आक्षेप घेतल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.