मुंबई : राज्यात लांबलेला पाऊस आणि उन्हाळय़ामुळे शेतीसाठी वाढलेला पाणीवापर, जलसाठय़ांचे वेगाने होणारे बाष्पीभवन यांमुळे राज्यातील जलसाठय़ांची पातळी खालावत चालली आहे. राज्यातील जलाशयांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत तो तीन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे अनेक भागांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या वर्षी पाऊस लांबल्याने बहुतांश धरणे भरली होती. मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये पाण्याची पातळी घटू लागली आहे. सध्या राज्यातील जलाशयांमध्ये २५.१२ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच काळात जलाशयांमध्ये २८.१७ टक्के साठा होता. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा महसूल विभागांतील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठय़ांची नोंद केली जाते. सर्वात जास्त ४०.९० टक्के अमरावतीत, तर पुणे विभागात १८.८७ टक्के इतका सर्वात कमी जलसाठा आहे. राज्यात नागपूर वगळता सर्व विभागांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. पाऊस लांबल्याने पेरण्या करू नयेत, असे आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केले आहे. त्यानुसार, अद्याप पेरण्या सुरू झालेल्या नाहीत.
आतापर्यंत एकूण क्षेत्रावर जेमतेम एक टक्का पेरण्या झाल्या आहेत. मात्र, उन्हाळी म्हणजे रब्बी हंगामातील मुख्य पिकांच्या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत १२९ टक्के इतकी जास्त वाढ केली आहे. या कालावधीत एकूण उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र तीन लाख ४९ हजार ७५९ हेक्टर इतके अंदाजित असताना यंदा चार लाख ५२ हजार ३३५ हेक्टरवर पेरणी झाली. गेल्या वर्षी चार लाख ३३ हजार ५५७ हेक्टर इतकी होती. तृणधान्य पिकांची १५४ टक्के, अन्नधान्य १४३ टक्के तर गळीत धान्याच्या पेरणीत १०४ टक्के इतकी वाढ झाली आहे.
कोकण सर्वाधिक तहानलेला जूनच्या मध्यावर राज्यातील ५१५ गावे आणि १२४६ वाडय़ांना ३८१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात कोकणातील सर्वाधिक २७४ गावे, ७७३ वाडय़ांना १४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ८९ गावे, १४७ वाडय़ांना ९६ टँकर, तर पुणे विभागात ७७ गावे, ३१४ वाडय़ांना ६३ टँकरने पुरवठा केला जात आहे.