मुंबई : पुणे – शिरुर उन्नत रस्त्याच्या बांधकामाच्या आर्थिक निविदा सोमवारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) खुल्या केल्या. अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेडसह तीन कंपन्यां स्पर्धेत होत्या. त्यात अखेर वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेडने बाजी मारली. त्यामुळे या उन्नत रस्त्याचे बांधकाम ‘बांधा – वापरा – हस्तांरित करा’ तत्वावर वेल्सपूनन करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

एमएसआयडीसीने पुणे-छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग आणि सध्याच्या पुणे-छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे – शिरुर उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. ५४ किमी लांबीच्या आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाच्या या उन्नत रस्त्यासाठी एमएसआयडीसीकडून काही दिवसांपूर्वी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या. अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड, वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेड आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपन्यांनी निविदा सादर करण्यात आल्या होत्या. या निविदांची छाननी करून सोमवारी आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून यात वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेडने बाजी मारल्याची माहिती एमएसआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेडकडून १०,१२४.०७ कोटी रुपयांची, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडकडून १०,३३५.८५ कोटी रुपयांची आणि वेल्सपून एन्टरप्रायझेस लिमिटेडकडून ८७४५.३८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. वेल्सपूनची बोली सर्वात कमी असल्याने आता या प्रकल्पाचे बांधकाम वेल्सपूनकडून केले जाणार आहे.

वेल्सपूनची बोली सर्वात कमी असली तरी एमएसआयडीसीच्या बोलीपेक्षा ४५.९५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे एमएसआयडीसीकडून खर्च कमी करण्यासाठी वाटाघाटी करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रकल्प वेल्सपूनच्या माध्यमातूनच मार्गी लावला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता या निविदेला एमएसआयडीच्या बैठकीत मान्यता घेऊन यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर कंपनीला निधी उभारणीसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू होण्यासाठी मे-जून २०२६ उजाडण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून चार वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता २०३० मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पुणे – शिरुर प्रवास दोन ते अडीच तासांतऐवजी केवळ ४५ मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुणेकरांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.