मुंबई : मुंबईतील सर्वात व्यग्र उड्डाणपुलाची गतिशीलता वाढवण्याच्या उद्देशाने परळ भागातील जुना प्रभादेवी उड्डाणपूल पाडून, त्याजागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी आणि शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडण्यासाठी हा पूल उपयुक्त ठरणार आहे. या पुलाचे पाडकाम सुरू झाले आहे. परंतु, या पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी पश्चिम रेल्वेने ‘वे लीव्ह चार्जेस’पोटी ५९ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडवर (महारेल) प्रभादेवी दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. प्रभादेवी आणि परळदरम्यान महत्त्वाचा पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा उड्डाणपूल मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरून जातो.

यामुळे हा प्रकल्प राबवणाऱ्या महारेलला उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वेची जागा वापरावी लागणार आहे. यासाठी रेल्वेला प्रकल्पाच्या अंदाजे दोन वर्षांच्या कालावधीसाठी ‘वे लीव्ह चार्जेस’साठी भाडे स्वरूपात ५९.१४ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी पश्चिम रेल्वेने केली आहे. तर, मध्य रेल्वेने १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

प्रभादेवी उड्डाणपुलाचे १० सप्टेंबर रोजी पाडकाम सुरू झाले. पुलाच्या दोन्ही टोकांवरील डांबर आणि पेव्हर ब्लाॅक काढण्यात आले आहेत. तथापि, रेल्वेने त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत रेल्वे रुळांवरील पुलाचा भाग पाडण्यास परवानगी दिलेली नाही. परिणामी, अंदाजे १६७.३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या बांधकामाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेने ५९.१४ कोटी रुपयांची मागणी केलेली असताना, महारेल्वेने ९ कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु रेल्वेने पैसे परत केले आणि प्रकल्पाचे काम करता यावे यासाठी संपूर्ण रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. तर, मध्य रेल्वेने १० कोटी रुपयांची मागणी केली असून ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर, उर्वरित देखभाल शुल्क देण्यात येणार आहे, अशी माहिती महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रभादेवी उड्डाणपूल हा व्यावसायिक नसून सार्वजनिक प्रकल्प आहे. त्यामुळे ५९ कोटी रुपये ‘वे लीव्ह चार्जेस’ची मागणी योग्य नसल्याचे महारेलच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एकाच वेळी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गांवर उभारला जाणारा पूल

प्रभादेवीचा उड्डाणपूल एकाच वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गिकावर तयार केला जाईल. या उड्डाणपुलाची एकूण लांबी १३२ मीटर आहे. या दुमजली पुलाचा खालील भाग (लोअर डेक) पदपथासह २ २ मार्गिका असेल. या मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी पूर्व-पश्चिमेला जोडणे शक्य होईल. तर, पुलाचा वरील भाग (अप्पर डेक) शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणारा २ २ मार्गिकेचा पूल असेल. या भागावर पदपथ नसेल. या पुलामुळे थेट अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूवरून ये-जा करणे सोयीस्कर होईल.

सध्याच्या उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यासाठी दोन ८०० मेट्रिक टन क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.