मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा बुधवारी सकाळपासून कूर्मगतीने धावत होती. परिणामी, नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. अनेक लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

पश्चिम रेल्वेवर पूर्व पावसाळी कामे सुरू आहेत. तर, अनेक ठिकाणी पायाभूत कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे, पश्चिम रेल्वेवरील अनेक मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. परिणामी, लोकलचा वेग मंदावल्याने सकाळपासून अनेक लोकल विलंबाने धावत होत्या. वातानुकूलित लोकलही विलंबाने धावत होत्या.

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली, कांदिवली, सफाळे, केळवे, नालासोपारा, वसई यार्ड, जोगेश्वरी-गोरेगाव येथे बुधवारी रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर व इतर देखभाल-दुरुस्तीची आणि पायाभूत कामे करण्यात येत होती. तसेच मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने, पूर्व पावसाळी कामे व इतर पायाभूत कामे करताना अडचणी आल्या. तसेच पावसानंतर पुन्हा रेल्वे मार्ग स्वच्छ करणे, नालेसफाई ही कामे करण्यात आली. या कामांदरम्यान लोकलचा वेग ताशी २० ते ३० किमी ठेवण्यात आला होता. परिणामी, लोकल सेवेचे तीनतेरा वाजले होते.