Loudspeaker Permission Extended till Midnight in Mumbai: यंदाच्या नवरात्रोत्सवात पावसाचे थैमान दिसून आल्यामुळे गरबा आणि दांडियाच्या आयोजनावर अनेक ठिकाणी पाणी सोडावे लागले. ग्रामीण भागात आलेली पूरपरिस्थिती आणि शहरी भागात मुसळधार पाऊस यामुळे खुल्या जागांवर आयोजित होणाऱ्या गरबा, दांडिया उत्सवांना थंड प्रतिसाद मिळाला. त्यातच पहिले काही दिवस लाऊडस्पीकरची मर्यादा रात्री १० वाजेपर्यंत असल्यामुळे गरबाप्रेमींच्या आनंदावर विरजन पडले. मात्र आता मुंबईसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. शेवटचे तीन दिवस गरब्याच्या ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढलेल्या पत्रकानुसार ध्वनिक्षेपक (साऊंड प्रोजेक्टर) व ध्वनीवर्धक (लाऊडस्पीकर) वापराबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत गरबा, दांडियासाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यासाठी काही अटी आणि बंधनेही घातली गेली आहेत. ती खालीलप्रमाणे
अटी आणि बंधने
- परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
- उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
- शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.
- ध्वनी प्रदूषण नियम, २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करणे आवश्यक राहील.
- तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.
- आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
नवरात्रोत्सवातील सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे, मात्र ठरवलेल्या मर्यादा आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेल, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.