धिंगाणा, हाणामाऱ्या रोखण्यासाठी र्निबध घालण्याचा सरकारचा विचार

दारू-बिअर पिऊन मध्यरात्री िधगाणा आणि हाणामाऱ्यांचे प्रकार वाढत असल्याने मद्यविक्री रात्री ११ पर्यंतच करण्याची मुभा देण्याचा विचार सुरू असल्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत परमीट रूम सुरू असतात. सरकारने हा निर्णय घेण्याची हिंमत दाखविल्यास त्यांना मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने निर्णय घेतल्यास मद्यप्रेमी आणि बारमालकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता असल्याने  असा निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी सांगितले.

सध्या पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रात्री दीड वाजेपर्यंत, तर जिल्हा पोलीस अधीक्षक क्षेत्रात रात्री साडेअकरापर्यंत मद्यप्राशनाची परवानगी असून अनेक परमीट रूम रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत सुरू असतात. मद्यप्राशनानंतर भोजनासाठी वेळ मिळावा, यासाठी या परमीट रूम सुरू ठेवल्या जातात. मद्यप्राशनानंतर धांगडधिंगा व हाणामाऱ्यांचे प्रकार होतात. नागपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारामारीत एका तरुणाला जीव गमवावा लागला. या पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कोणती पावले उचलली जाणार आहेत, असे विचारता नागपूरमधील प्रकरणात पोलिसांनी त्यांची कारवाई केली आहे. पण आता हे प्रकार टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून काही पावले उचलली जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

काय होणार ?

अनेक बार मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जातात आणि गोंधळ घातला जातो, अशा तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे दारू-बिअरची विक्री रात्री ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे र्निबध घालण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा विचार आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ‘रात्रजीवन’ (नाइटलाइफ) सुरू करावे, अशा मागण्या होत आहेत. या पाश्र्वभूमीवर रात्री ११ पर्यंतच मद्यप्राशनाची परवानगी मिळाली तर मद्यप्रेमींचा मात्र मोठाच हिरमोड होणार आहे.