मुंबई : केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही ह्रदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यातही महिलांमध्येही ह्रदयविकाराचा त्रास वाढत असल्याचे दिसत असून यामागे वाढता ताणतणाव, जीवनशैली, अपुरी झोप तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आदी कारणे आहेत.हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. राज्याच्या आरोग्य विभागाने नेमकी हिच गरज ओळखून राबविलेला ‘स्टेमी’ प्रकल्प आज ह्रदयरुग्णांसाठी मोठा आधार ठरताना दिसत आहे.
‘आपल्या हृदयाला जपा’ या घोषवाक्यासह २९ सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त महाराष्ट्रात हृदयविकारांविषयी जनजागृती व उपचार सुविधा वाढवण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होतात. यामध्ये ८५ टक्के मृत्यू हृदयविकाराचा झटका (स्टेमी) व स्ट्रोकमुळे होतात. भारतात दरवर्षी ३० लाखांहून अधिक स्टेमी रुग्ण आढळतात. महाराष्ट्रातही ४० ते ७० वयोगटातील मृत्यूंपैकी मोठा वाटा हृदयविकारांमुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.हृदयविकाराचे निदान ईसीजीसारख्या सोप्या आणि स्वस्त तपासणीद्वारे शक्य असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चांगल्या दर्जाचे यंत्र नसणे, रुग्णसंख्या जास्त असणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे वेळेत निदान होण्यात अडथळे येतात. त्यामुळे अकाली मृत्यू कमी करण्यासाठी तसेच हृदयविकाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी राज्य शासनाने ‘स्टेमी महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
आरोग्यविभागाने बंगळूरस्थित ‘ट्रायकॉग हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन या प्रकल्पाला वेग दिला आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी प्रत्येक मिनिट अमूल्य ठरत असल्याने झटका आल्यानंतर सुवर्ण तास (६० मिनिटे) आत उपचार सुरू करणे जीवनरक्षणासाठी महत्त्वाचे ठरते. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २४१० सरकारी आरोग्य संस्था, जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण व सामान्य रुग्णालये, स्त्रीरुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या स्पोक्स स्वरूपात प्रकल्पात सहभागी करण्यात आली आहेत. येथे रुग्णांना मोफत ईसीजी व क्लाऊड तंत्रज्ञानाद्वारे चार मिनिटांत तज्ज्ञांचे विश्लेषण मिळते.
आतापर्यंत २६ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली असून ८६ हजारांहून अधिक गंभीर हृदयविकारांची व १७ हजारांहून अधिक स्टेमी प्रकरणांची ओळख पटली आहे.स्टेमी रुग्णांना तात्काळ रक्ताच्या गुठळ्या विरघळवणारी औषधे देऊन पुढील २४ तासांत मोठ्या उपचारकेंद्रात पाठवले जाते. ९६ हब रुग्णालयांमध्ये (सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, खासगी व धर्मादाय रुग्णालये) कॅथलॅब्स उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून या उपचारांचा समावेश असल्याने रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपाससारख्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
आरोग्य सेवा संचालनालयातील असंसर्गजन्य रोग विभागाचे सहसंचालक यांनी सांगितले, स्टेमी महाराष्ट्र हा फक्त कार्यक्रम नाही, तर जीव वाचवण्याची चळवळ आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि डॉक्टरांचे सबलीकरण याद्वारे वेळेत उपचार मिळाल्यास अनावश्यक मृत्यू टाळता येतात. हृदयविकार उपचाराच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे याचा आम्हाला अभिमान आहे.राज्यातील हृदयरोगस्थितीची आकडेवारी आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. ग्रामीण भागात ३ ते ४ टक्के आणि शहरी भागात ८ ते १० टक्के लोकसंख्या हृदयरोगग्रस्त आहे. कोरोनरी आरट्री आजारामुळे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे.सुरुवातीला १२ जिल्ह्यांत सुरू झालेला स्टेमी प्रकल्प आता ३४ जिल्ह्यात पोहोचला आहे.
हृदयविकाराच्या निदानासाठी ईसीजी तपासण्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. २०२०-२१ मध्ये ३,४०२ ईसीजी तपासण्या झाल्या व त्यात ३० स्टेमी प्रकरणांची नोंद झाली. २०२४-२५ मध्ये हा आकडा तब्बल १०,७३,२३२ तपासण्यांवर गेला असून ६,०७७ स्टेमी प्रकरणांची नोंद झाली. २०२५ च्या ३० एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत १,४१,१९० तपासण्या व ६६२ स्टेमी प्रकरणे नोंदली गेली.
स्पोक्स स्वरुपातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक ईसीजी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. तेथील तपासणीनंतर ईसीजी क्लाऊडवर अपलोड होतो व बंगळुरूस्थित ‘ट्रायकोंग हेल्थ’च्या माध्यमातून प्रगत एआय तंत्रज्ञान वापरून काही मिनिटांत निदान तयार होते. हा अहवाल इंटरनेटच्या मदतीने सरासरी ४ मिनिटांत रुग्णालयाला मिळतो. स्टेमीचे निदान झालेल्या रुग्णावर त्वरित थॅबोलायसिस उपचार देऊन पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने हब संस्थेत हलवले जाते.
स्टेमी म्हणजे काय
‘एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन’ हा हृदयविकाराचा प्रकार असून हृदयाच्या काही भागास रक्तपुरवठा थांबल्याने ऑक्सिजनअभावी हृदयाच्या स्नायूंना इजा होते व झटका येतो. या प्रकल्पाचा उद्देश रुग्णाला झटका आल्यानंतर अर्ध्या तासात औषधोपचार देऊन मृत्यूदर कमी करणे, तसेच हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे ओळखण्याबाबत जनजागृती करणे हा आहे. स्टेमी प्रकल्पामुळे ग्रामीण-शहरी भागात हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने निदान व योग्य उपचार मिळणे शक्य झाले आहे. हब व स्पोक संस्थांमधील समन्वयामुळे ‘गोल्डन अवर’ वाया न जाता उपचारांची शृंखला कार्यान्वित राहते.‘जागतिक हृदय दिना’निमित्त स्टेमी प्रकल्प हा महाराष्ट्रातील रुग्णांसाठी प्रभावी कवचकुंडले ठरत असून, वाढत्या ईसीजी तपासण्यांमुळे व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हृदयविकारावर वेळेत मात करण्याचा आत्मविश्वास आरोग्य यंत्रणेला मिळत आहे.