मुंबई : ठाणे येथे प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी रंगणार आहे. महाराष्ट्रातील मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार देशापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदा वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रॅण्ड ॲम्बेसेडर असणार आहेत. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावण्यासाठी राज्यभरातील १६ संघांमध्ये चुरस रंगणार आहे.

दरम्यान, ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी २८ व २९ जून रोजी ठाणे (पश्चिम) येथील दिवंगत बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे रंगली होती. या फेरीतून एकूण १६ गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या संघांसाठी व नावांसाठी संघ बोली कार्यक्रम (टीम ऑक्शन) हा वांद्रे – कुर्ला संकुलातील सोफीटेल येथे नुकताच पार पडला. त्यानंतर आता १६ संघांमध्ये वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम फेरी रंगणार असून विजेत्यांना एकूण दीड कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

‘विविध संघांसाठीची स्पर्धात्मक बोली (टीम ऑक्शन) ही ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या मोठ्या बदलाचे प्रतीक आहे. एकेकाळी केवळ उत्सवाचा भाग असलेली ही परंपरा आता एका व्यावसायिक साहसी खेळात बदलली आहे. ज्यामध्ये खेळाडूंकडे प्रचंड ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य असणे आवश्यक आहे. जागतिक क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर झाल्यामुळे स्पर्धेला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. युवा गोविंदांना करिअरची संधी देऊन महाराष्ट्राचा हा वारसा देशात आणि जगात पोहोचवणे, हा आमच्यासाठी तसेच स्पर्धेच्या दृष्टीने एक अभिमानाचा व महत्वाचा टप्पा आहे’, असे ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

एकूण दीड कोटींची बक्षिसे

‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील विजेत्यांसाठी एकूण दीड कोटींची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि सहभागी संघांना प्रत्येकी ३ लाख रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘प्रो – गोविंदा’ तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीतील संघ व त्यांची नावे

१) आर्यन्स गोविंद पथक : नागपूर निन्जास

२) बाल उत्साही गोविंदा पथक, जोगेश्वरी : अलिबाग नाईट्स

३) संभाजी क्रीडा मंडळ : शूर मुंबईकर

४) संत नगर गोविंदा पथक : ठाणे टायगर्स

५) विघ्नहर्ता गोविंदा पथक : मिरा भाईंदर लायन्स

६) यश गोविंदा पथक : नाशिक रेंजर्स

७) अष्टविनायक क्रीडा मंडळ : दिल्ली इगल्स

८) साई राम गोविंदा पथक : सुरत टायटन्स

९) शानदार गोविंदा पथक : जयपूर किंग्स

१०) अखिल मालपा डोंगरी क्र. १, २, ३ मित्र मंडळ गोविंदा पथक : बंगळूरू ब्लेझर्स

११) शिवटेकडी गोविंदा पथक : हैदराबाद डायनामोज

१२) शिवसाई क्रीडा मंडळ : गोवा सर्फर्स

१३) ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक : वाराणसी महादेव असेंडर्स

१४) शिवनेरी गोविंदा पथक : लखनऊ पँथर्स

१५) हिंदुराज गोविंदा पथक, दापोली : नवी मुंबई स्ट्रायकर्स

१६) शिव गणेश मित्र मंडळ : मुंबई फाल्कन्स योद्धाज