लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक सत्राला १६ जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप तासिका किंवा कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या न झाल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होत आहे. विशेष म्हणजे, सर्व विभाग मिळून केवळ ४३ पूर्णवेळ प्राध्यापक असून १९ विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही. असे असताना नियुक्त्या का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाने नुकताच या वर्षाचा वार्षिक अहवाल संकेतस्थळावर प्रकाशित केला. यामध्ये विविध विभागांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये सद्यस्थितीत एकूण ४४ विभाग आहेत. मात्र, १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे प्राध्यापकच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तासिका प्राध्यापकांकडूनच विद्यापीठाचा शैक्षणिक गाडा पुढे रेटण्यात येत आहे.

आणखी वाचा- दीक्षाभूमीला कोणत्या नियमाच्या अंतर्गत जमीन देता येईल? उच्च न्यायालयाची विचारणा…

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले. तर पदव्युत्तर प्रथम अभ्यासक्रमाचे प्रवेशही पूर्ण झाले असून त्यांचेही शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. असे असतानाही तासिका प्राध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. अनेक विभागांमध्ये प्राध्यापक नाहीत तर कुठे एकच प्राध्यापक आहे. मागील काही वर्षांपासून नियमित वेतनावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जात होती. मात्र, यंदा कंत्राटी प्राध्यापकांचीही नियुक्ती झाली नाही.

३६७ प्राध्यापकांची गरज

सर्व शैक्षणिक विभागांत तासिका तत्त्वावरील तब्बल ३६७ प्राध्यापकांची गरज आहे. औषधनिर्माणशास्त्र विभागात सर्वाधिक २२ प्राध्यापक लागतात. त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभागात २० प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात १७ प्राध्यापक, तर प्राणिशास्त्र आणि ललित कला विभागात प्रत्येकी १६ तासिका प्राध्यापकांची गरज आहे.

आणखी वाचा- गणेशोत्सवात ‘पीओपी’ मूर्ती नकोच, थेट उत्पादकांवर कारवाई…

केवळ ४३ पूर्णवेळ प्राध्यापक

सर्व विभाग मिळून केवळ ४३ पूर्णवेळ प्राध्यापक असून १९ विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही. प्राध्यापकपदाबरोबरच सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांचीही अनेक पदे रिक्त आहेत. ४४ विभागांमध्ये २३ सहयोगी प्राध्यापक कार्यरत आहेत. २७ विभागांमध्ये एकही सहयोगी प्राध्यापक नाही. सहायक प्राध्यापकांचीही अशीच परिस्थिती आहे. सर्व विभागांत केवळ २८ सहायक प्राध्यापक आहेत. २० विभागांमध्ये एकही सहायक प्राध्यापक नाही

“तासिका प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. सर्व विभाग प्रमुखांना तसे पत्रही दिले आहे. मात्र, तरीही नियुक्त्या रखडल्या असतील तर त्याची दखल घेऊन कार्यवाही पूर्ण करू.” -डॉ. प्रशांत बोकारे, प्रभारी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 year old nagpur university has no professors in 19 departments reality of teachers day dag 87 mrj