लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात ‘जीबीएस’ने चंद्रपूर जिल्ह्यात धडक दिली आहे. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक जीबीएसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या महिनाभरापासून या रुग्णावर नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. मात्र आरोग्य यंत्रणाच याबाबत अनभिज्ञ आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना गावातील एका १२ वर्षीय मुलीला जीबीएसची लागण झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. राज्यातील अनेक जिल्ह्यात जीबीएस या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत राज्यात १६९ रुग्ण दगावल्याची माहिती आहे. या आजाराने आता जिल्ह्यात सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. तो शरीरातील रोग प्रतिकार शक्तीवर हल्ला करतो.

पोंभूर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी साक्षी (१२) हिची १ जानेवारीला अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिला ४ जानेवारीला पोंभुर्णा येथे नेण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे चंद्रपूर आणि नंतर नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यता आले. तिथे तपासणीत तिला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. साक्षीवर मागील एक महिन्यापासून उपचार सुरू आहेत. जीबीएसचे उपचार खर्चिक आहेत.साक्षीचे वडील सालगडी आणि आई मोलमजुरीचे काम करतात.तिच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करायची, असा प्रश्न तिच्या पालकांसमोर उभा ठाकला आहे.

जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाची पोंभुर्णा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कल्पनाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. जीबीएसचा रुग्ण सापडल्याची माहिती लपविण्याचा ‘प्रताप’ यंत्रणेकडून नेमका कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

लक्षणे काय?

साधारणतः ७८ हजार लोकांमध्ये एकाला हा सिंड्रोम होतो. तो का होतो, याची सगळी कारण अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा जिवाणूच्या संसर्गानंतर त्याची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे मळमळ, उलट्या, जुलाबचा त्रास उद्भवतो. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो. थकवा, हातापायाला मुंग्या येणं – झिणझिण्या येणं हे याचं लक्षण असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं हात, चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

या मुलीला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उपायोजना आणि सतर्कता म्हणून तत्काळ आम्ही चेक ठाणेवासना,दिघोरी, गंगापूर, नवेगाव मोरे येथील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताच्या सुद्धा नमुने घेतले आहे. मात्र जीबीएसचे लक्षण इतरांत आढळून आले नाही. आणखी काही गावातील नागरिकांच्या रक्तांची तपासणी केली जात आहे. -डॉ.संदेश मामीडवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोंभुर्णा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 year old girl diagnosed with guillain barre syndrome in chandrapur rsj 74 mrj