यशोधरानगर येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाला चॉकलेट खाण्याची सवय. आईने दिलेल्या पैशातून त्याने चॉकलेट आणले. त्यामुळे आईने त्याच्यावर आरडाओरड केली. आईच्या रागावर त्याने चक्क घर सोडून कुठेतरी निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्याने थेट सायकल घेतली आणि घर सोडून निघून गेला. मुलगा अचानक बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांत तक्रार करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी अनर्थ होण्याची भीती असल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यशोधरानगर पोलीस आणि मानवी तस्करी विरोधी पथकाने तब्बल दोन दिवस परीश्रम घेत त्या मुलाचा शोध घेतला. मुलाला पालकांच्या स्वाधीन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलगाव परिसरात राहणारा मिस्त्री नावाचा युवक ओडिशा राज्यात मोठ्या कंपनीत नोकरी करतो. त्यांना एक मुलगा व मुलगी असून त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यानंतर त्यांनी विवाह संकेतस्थळावरून एका मुलाची आई असलेल्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर तीन मुलांसह दाम्पत्य राहत होते. त्यांचा १३ वर्षीय मुलगा वंश (काल्पनिक नाव) याला नेहमी चॉकलेट खाण्याची सवय आहे. त्यामुळे त्याला पैसे मिळाले की तो चॉकलेट विकत आणत होता. गुुरुवारी वंशने चॉकलेट विकत आणल्यामुळे त्याच्या सावत्र आईने त्याच्यावर आरडाओरड केली. त्यामुळे त्याने रागाच्या भरात सायकल काढली आणि घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यामुळे मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार यशोधरा पोलीस ठाण्यात दाखल केली.

थकल्याने ढाब्यासमोर झोपला

वंश हा कन्हानजवळ पोहचल्यानंतर तो ओमरे नावाच्या ढाब्याजवळ थांबला. त्याला भूक लागल्याने तो ढाब्यासमोरील झाडाच्या ओट्यावर झोपला. ओमरे यांनी त्याला उठवले असता वंशने भूक लागल्याचे सांगितले. त्याला थोडे खायला दिल्यानंतर ढाब्यावरच झोपायला सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याची विचारपूस केली असता तो सांगत नव्हता. त्यामुळे ओमरेने त्याला कन्हान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, ड्युटी अधिकाऱ्यांनी ओमरे यांना तक्रार न ऐकून घेता पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार घडल्याने ओमरे यांनी मुलाला ढाब्यावर थांबवून ठेवले.

असा लागला मुलाचा शोध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ आणि सहकारी राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, मनीष पराये, शेख शरीफ, पल्लवी वंजारी यांनी मुलाचा शोध सुरू केला. वंश निघून गेलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर तो गेलेल्या रस्त्याने पोलीस शोध घेत होते. शेवटी मुलाची विचारपूस करताना कन्हानमधील ओमरेच्या ढाब्यावर मुलगा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तेथून मुलाला सोबत घेतले आणि पालकांच्या स्वाधीन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 year old boy leave home after step mother angry adk 83 zws