नागपूर : घरात भाड्याने राहणाऱ्या दाम्पत्याच्या १४ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घरमालक युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. प्रतिक आसोले (२०) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे. पीडित भाडेकरू १४ वर्षीय मुलगी आठव्या वर्गात शिकते. ती सावत्र वडील आणि आईसह राहते. आईवडील दोघेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कामाला जातात. त्यामुळे मुलगी घरी एकटीच राहते. गेल्या काही दिवसांपासून घरमालक प्रतिक आसोले हा त्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता.

तिच्याशी वारंवार गोडगोड बोलून मैत्री करण्यासाठी दबाव टाकत होता. तिला मोबाईलवर अश्लील छायाचित्र दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. आईवडील घरी नसताना वारंवार घरी येऊन तिच्याशी अश्लील संवाद साधत होता. शुक्रवारी सकाळी मुलीचे आईवडील कामावर निघून गेले. प्रतिकने त्या मुलीला घरी एकटी बघून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिचे तोंड दाबून बलात्कार केला. आईला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. सायंकाळी तिने आईला घडलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा >>> Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

मात्र, आईने घरमालक घरातून काढून देतील म्हणून लगेच काही तक्रार केली नाही. सोमवारी ती मुलगी शाळेत गेल्यानंतर तिने शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. शिक्षकाने तिच्या पहिल्या वडिलांना शाळेत बोलावून माहिती दिली. त्याने पत्नीला मुलीसोबत सक्करदरा पोलीस ठाण्यात पाठवून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रतिकला अटक केली. त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली.