नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हायटेक युगात तंत्रज्ञान स्मार्ट झाले तरी गाफिलतेमुळे व्यवहार स्मार्ट होत नसल्याने सरासरीने देशांतील फसवणूकीचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढले आहे. देशभरातल्या आर्थिक फसवणूकीचा आकडा ४० हजार ७६० वरून वाढत २०२३ या आर्थिक वर्षात ४१ हजार २२० पर्यंत पोचला आहे. राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहरही आर्थिक फसवेगिरीच्या प्रमुख महानगराच्या रांगेत जाऊन बसले आहे.
केंद्रिय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने सादर केलेल्या २०२३ च्या अहवालात देशातील विविध स्वरुपाच्या गुन्हेगार घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यातल्या नोंदी नुसार नागपूरात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये सरासरी २८ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद पोलीस डायरीने घेतली आहे. यात शहरातील ६९७ जणांच्या आयुष्यभराची जमापुंजी लुटली गेली. फसवल्या गेलेल्या या नागपुरकरांपैकी ५५ टक्के प्रकरणांची ना अद्याप चौकशी पूर्ण झाली आहे ना फसवणूकीला बळी पडलेलेल्यांच्या रकमेचा परतावा होऊ शकला आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे यापैकी ६६० प्रकरणे ही बनावटगिरीची आहेत. याला बळी पडलेले ३४ पिडीत हे ओळखीतल्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे फसवले गेले आहेत.
८० टक्के लोक कनिष्ठ मध्यमवर्गीय गटातले
जवळच्याच व्यक्तीकडून फसवणूक झालेल्यांपैकी सर्वाधिक ५७२ पिडीतांना रोख आणि अन्य स्थावर मालमत्ता गमवावी लागली आहे. यातील २३७ जणांची १ ते १० लाख, ८८ जणांची १० ते ५० लाख रुपयांची फसवणूक झाली. याचा अर्थ फसवले गेलेले ८० टक्के लोक हे कमी आर्थिक उत्पन्न गटातले अथवा कनिष्ठ मध्यमवर्गीय गटातले आहेत. तर ३७ जणांची ५० हून अधिक लाख रुपये किमतीचा रोख आणि स्थावर मालमत्ता विश्वासघाताने बळकावली गेली. उर्वरित २०९ जणांची एक लाखांपर्यंतची मिळकत लूबाडली गेली.
फसवणीकीत मुंबई देशाची राजधानी
राज्याची राजधानी असलेले मुंबई शहर आर्थिक फसवणूकीत देशाची राजधानी बनले आहे. गुन्हेगाराचे हब असलेल्या १९ महानगरांच्या यादीत मुंबईतला आर्थिक फसवणूकीचा टक्का सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत आर्थिक फसवणूकीचे २०२३ या वर्षात ६ हजार ४७६ गुन्हे नोंदवले गेले. मुंबईत १५० व्यक्ती २०२३ यावर्षात १ ते १० कोटी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडले. तर २७ जण १० ते २५ कोटींपर्यंतची मालमत्ता गमावून बसले.