चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात सुरू असलेल्या कामावर ग्रामीण भागातील मजुरांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. मजूर उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसऱ्यास्थानी तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यांतर्गत सर्व तालुक्यांमधील ‘मनरेगा’च्या विविध कामांवर ७१ हजार ६४३ एवढे मजुर कार्यरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पाणी टंचाईची दाहकता वाढली! मेहकर, बुलढाणा तालुक्यातील तीव्रता अधिक

शेतीतील कामे संपल्यावर शेतमजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध नसतात. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात मनरेगा महत्त्वाची भुमिका बजावत आहे. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक, अशा दोन्ही प्रकारची कामे हाती घेतल्या जाते. यामध्ये भूमिहीन शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, शेततळे, मजगी, फळभाग, शेतबांध बंदिस्ती, बोळी खोलीकरण, नॉडेप, शौषखड्डे, गुरांचे गोठे, बायोगॅस, शेळी निवारा, कुकुटपालन शेड, अशी विविध वैयक्तिक स्वरुपाची कामे तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे गोदाम, ग्रामपंचायत भवन, ग्रामसंघ भवन, पांदन रस्ते, तलावतील गाळ काढणे, वृक्ष लागवड, अशी विविध कामे या योजनेंतर्गत केली जातात.

हेही वाचा >>> वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास

‘मजुरांचे स्थलांतरण कमी करणे शक्य’

चंद्रपूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी होणारे स्थलांतरण मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कमी करणे शक्य झाले आहे. क्रीडांगण, गोदाम, आदींसारख्या मालमत्ता ग्रामीण भागात या योजनेमुळे उभारल्या जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 thousand 643 labour working on mgnrega work in chandrapur district rsj