बुलढाणा : मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली असून, अन्य तालुक्यांच्या तुलनेत मेहकर व बुलढाणा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील १८५ गावांतील तब्बल एक लाख नागरिकांना खाजगी टँकर व खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे. या परिणामी पाण्यासाठी लाखावर ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे.




जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १५ गावांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा व देव्हारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय सावरगाव माळ (सिंदखेडराजा), पोखरी, तपोवन (मोताळा), वरवंड (मेहकर), धोडप, डोंगरशेवली (चिखली), किनगाव जट्टू (लोणार) या गावातही टँकर सुरू आहेत. मागील आठवड्यात टँकरची संख्या १२ इतकी होती. दुसरीकडे १० तालुक्यांतील १७० गावांची तहान १८१ अधिग्रहित विहिरीवरून भागविली जात आहे. मेहकरमध्ये ४२ गावांसाठी ४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
हेही वाचा – वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास
दीड कोटींचा खर्च
दरम्यान आजवर करण्यात आलेल्या उपाय योजनांवर २८ मे अखेर १ कोटी ५३ लाख रुपये खर्ची करण्यात आले आहे. १८५ गावांत कृती आराखड्यातील १९७ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे.