नागपूर : शुक्रवारी मध्य रात्रीपासून तर शनिवारी सकाळपर्यंत उपराजधानीत ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. शहरात अवघ्या दोन तासांत ९० मिलीमीटर, तर अवघ्या १२ तासांत तब्बल १५९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
यापूर्वी नागपुरात सप्टेंबर महिन्यात १९६२ साली २४ तासांत सर्वाधिक १८४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तब्बल ६० वर्षांनंतर आज सर्वाधिक नोंद झाली आहे. यावर्षीही संपूर्ण पावसाळ्यात २४ तासांत झालेली ही सर्वाधिक नोंद ठरली. रामदासपेठ, धंतोली, पंचशील चौक, सीताबर्डी या भागात पूरसदृश्य स्थिती झाली होती. लोकांची घरे, दुकान, प्रतिष्ठानामध्ये पाणी शिरले व कोट्यवधीचे नुकसान झाले. या भागात रुग्णालयांची संख्या अधिक आहे. पहिल्या माळ्यापर्यंत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना बोटींद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उच्चभ्रू म्हणून मानल्या जाणाऱ्या या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नागरिकांनी ही स्थिती अनुभवली.
हेही वाचा – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र; चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन
गेल्या वर्षी १३ सप्टेंबरला २४ तासांत सर्वाधिक १२७.४ मिलीमीटर पाऊस झाला होता. विशेष म्हणजे अनेक वर्षांत सप्टेंबरमध्ये झालेल्या मासिक पावसापेक्षा अधिक पाऊस आज २४ तासांत झाला आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 mm rain in two hours in nagpur 159 mm of rain was recorded in just 12 hours rgc 76 ssb