लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला: अकोला परिमंडळांतर्गत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या दोन लाख ३९ हजार ग्राहकांच्या तपासणीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य केले, तर त्यांना तत्काळ नवीन मीटर देत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. वीज चोरी होत असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले. या प्रकरणी ९२ जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिमंडळांतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील दोन लाख ३९ हजार ग्राहकांचा २२३ कोटी ८५ लाखाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करूनही ग्राहक वीज बिलाची थकबाकी भरण्यास तयार नाही. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या अकोला जिल्ह्यातील ६, बुलढाणा जिल्ह्यात ७४ आणि वाशीम जिल्ह्यातील १२ जणांकडे वीज चोरी होत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्यानुसार फौजदारी दाखल करण्यात आली आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ८३० आणि १९१५ ग्राहकांकडून १८५ लाख रूपये थकबाकीपोटी वसुल करण्यात आले आहेत.

हेही वाचा… वाशीम: महिन्याभरानंतरही चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागेना! कामरगाव ज्वेलर्स चोरी प्रकरण

एप्रिलपासून राबविण्यात येणारी ही मोहीम जुन महिन्यात अधिक धडकपणे राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेसाठी प्रत्येक उपविभागाचे एक याप्रमाणे अकोला जिल्ह्यात १०, बुलढाणा जिल्ह्यात १५ आणि वाशिम जिल्ह्यात ६ पथकाची निर्मिती केली आहे. तसेच अकोला, बुलढाणा, वाशीम आणि परिमंडल कार्यालयाचे एक याप्रमाणे चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक या मोहिमेत सहभागी होत आहे. वीज चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. दंडासहीत तीन वर्षाच्या शिक्षेपर्यंतची यात तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणीच घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against 92 people due to electricity theft in akola ppd 88 dvr