नागपूरमध्ये एका व्यक्तीच्या घरात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा सापडला. जवळपास १० ते १५ लाख रुपये किंमतीच्या नोटा असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. दोन मित्रांनी कलर प्रिंटर आणि स्कॅनरच्या सहाय्याने दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. विजय दशरथ गोलाईत (४२, बैरामजी टाऊन, सदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गोलाईत हा सदरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी नोकर म्हणून कार्यरत आहे. त्याला झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याची कल्पना सूचली. त्याने एका मित्राला ही कल्पना सांगितली आणि दोघांनीही तयारी सुरु केली. त्यांनी कलर प्रिंटर आणि स्कॅनर विकत घेतले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नोटा स्कॅन करून बनावट नोटा बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला हुबेहुब नोटा तयार होत नव्हत्या. त्यामुळे दोघांनी रात्र-रात्र जागून बनावट नोटा तयार केल्या. शेवटी विजयला यश आले. सुरुवातीला पाचशेच्या नोटा बनविल्या आणि दुकानात चालवल्या. अनेक दुकानदारांनी त्या बनावट नोटा स्वीकारल्या आणि वस्तू दिल्या. त्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास वाढला. त्यामुळे दोघांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बनवणे सुरू केले. घरीच उद्योग करीत त्यांनी १० ते १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या.

विजय आणि त्याच्या मित्राने यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बरेच दिवस सराव केला. दोघेही हुबेहूब नोटा तयार करायला लागले. त्या नोटांद्वारे किराणा, नाश्ता, रोजचा खर्च, धान्य आदी भागवायला लागले. त्यामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर दोघांनीही बनावट नोटा छापण्याचा सपाटा सुरू केला.

हेही वाचा- बुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण

असा पकडला गेला

विजय गोलाईत हा २२ नोव्हेंबरला शम्मी गुप्ता यांच्या मंगळवारीतील नाश्त्याच्या दुकानावर गेला. त्याने नाश्ता केल्यानंतर बनावट पाचशेची नोट दिली. आठवड्यानंतर विजयने पुन्हा बनावट पाचशेची नोट गुप्ता यांना दिली. तर ६ डिसेंबरला तो गुप्ताकडे आला आणि नाश्ता केल्यानंतर पाचशेची बनावट नोट दिली. गुप्ता यांना संशय आला. त्यांनी लगेच त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन काही बनावट नोटा ताब्यात घेतल्या. गुन्हा दाखल करून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person was arrested in nagpur for making fake currency notes after taking training from youtube adk 83 dpj
First published on: 09-12-2022 at 10:15 IST