नागपूर :  आदिवासी समाजातील अत्यंत गरीब तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठाची प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते. होतकरू आदिवासी विद्यार्थ्यासाठी काम करणाऱ्या निवृत्त आदिवासी अधिकाऱ्यांची स्वंयसेवी संस्था या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली. त्यांनी ऐनवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे या विद्यार्थ्यांचे विधि विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कमलेश भगतीसिंह तुलावी, कल्याणी बलदेव कोटवार व खुशी रमेश वाडीवे या तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे ३ लाख ६५ हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागते. विद्यार्थी गरीब असल्याने त्यांना ही रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रवेश प्रवेश रद्द होणार होते. ही बाब आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना कळली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली.  समाज कल्याण विभागाचे सेवा निवृत्त सहआयुक्त आर. डी. आत्राम, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अधीक्षक अभियंता उज्वल धाबे यांनी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाची मदत केली.

हेही वाचा >>>बुद्ध पौर्णिमेला मेळघाटात निसर्ग अनुभव ; वनविभाग सज्‍ज, १३१ मचाणांवरून…

आदिवासी होतकरु गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता मदत व्हावी यासाठी गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. फाउंडेशन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी समाजाने फाउंडेशनला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन फाऊंडशनचे सचिव डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आवाहन केले आहे.