प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करून सर्जनशील कलेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न शनिवारी विदर्भातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरून केला. सामाजिक भान असलेले विषय, त्यावर मार्मिक टिप्पणी करणारे संवाद आणि रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय, अशा एखाद्या कसलेल्या कलाकृतीला तोडीस तोड ठरणाऱ्या एकांकिका सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची नागपूर विभागाची प्राथमिक फेरी शनिवारी सर्वोदय आश्रमात पार पडली. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, चिमूर येथील महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये एकांकिका सादर केल्या. सकाळी दहा वाजता स्पर्धा सुरू झाली. सकाळपासून कलाप्रेमींनी एकांकिका पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी स्पर्धक महाविद्यालयांची लगबग सुरू होती. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताच्या साथीने एकांकिका सादर करायची असल्याने लगबग सुरू होती. या वेळी सादर झालेल्या ‘चित्रांगदा’ आणि ‘जत्रा’ नाटकाने रसिकांची मने जिंकली. बालपणापासून अर्जुनाची पूजा बांधणारी चित्रांगदा निराश होते. चित्रांगदेला राजसत्ता बहाल करणारा तिचा पिता मुलगा होताच तिला सत्तेवरून पायउतार करतो. काळ बदलला असला तरी आजही स्त्री आणि पुरुषामधील हा भेद कायम आहे. या दोन काळांचे जिवंत चित्रण मांडणारी ‘चित्रांगदा’ आणि करोनाकाळातील टाळेबंदीने हातमजुरी करणाऱ्यांची हालअपेष्टा मांडणारी ‘जत्रा’, या दोन्ही नाटकांतून सामान्य माणूस आणि स्त्रीच्या दु:खाची करुण कथा एकांकिकेच्या माध्यमातून फुलवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acting to bring a character to life on stage in the primary round amy
First published on: 04-12-2022 at 00:30 IST